पुणे : पुढारी वृत्तसेवा: केंद्र शासनाने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्यानंतर महापालिकेने शुक्रवारी (दि. 1) पहिल्याच दिवशी शहरातील 14 व्यावसायिकांवर कारवाई करून 391 किलो प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्य जप्त केले.
या कारवाईतून 70 हजार रुपये दंड वसूल केला आहे. पर्यावरणासाठी हानिकारक ठरणार्या 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य शासनाने 2018 पासूनच बंदी घातली आहे.
यानंतर राज्यात तसेच पुणे महापालिकेनेही प्लास्टिक पिशव्या व बंदी घातलेल्या युज अँड थ्रोच्या वापरातील प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तूंवर कारवाई सुरू केली आहे. महापालिका व राज्य प्रदूषण नियामक मंडळाच्या वतीने करण्यात येणार्या या कारवाया मध्यंतरी काहीशा थंडावल्या होत्या. परंतु, केंद्र शासनाने 1 जुलैपासून संपूर्ण देशभरातच या प्लास्टिकवर निर्बंध लादल्याने महापालिका पुन्हा 'अॅक्शन मोड'वर आली आहे.
पहिल्याच दिवशी महापालिकेने 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणार्या 14 व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून 391 किलो प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्य जप्त केले. त्यांच्याकडून पहिल्या कारवाईसाठीचा प्रत्येकी 5 हजार रुपये दंडही वसूल केल्याने पहिल्या दिवशी 70 हजार रुपये दंड जमा झाल्याची माहिती घनकचरा विभागप्रमुख आशा राऊत यांनी दिली.