पिंपरी : महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांनी सुचविलेली विशिष्ट औषधे मिळतच नाहीत | पुढारी

पिंपरी : महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांनी सुचविलेली विशिष्ट औषधे मिळतच नाहीत

दीपेश सुराणा : पिंपरी : कोणत्याही रुग्णाला आजारातून बरे करण्यामध्ये औषधोपचाराची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रुग्णांकडून औषधे घेतली जातात; मात्र डॉक्टरांनी सुचविलेली औषधेच न मिळाल्यास काय करायचे? ही औषधे घेण्यासाठी विविध औषधांच्या दुकानांत शोधाशोध करावी लागते. असाच काहीसा अनुभव सध्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना येत आहे.

रुग्णालयाकडे डॉक्टरांनी सुचविलेली विशिष्ट प्रकारची औषधे मिळत नसल्याने रुग्णांना ही औषधे बर्‍याचदा बाहेरून विकत घ्यावी लागत आहेत. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सध्या 850 प्रकारची अ‍ॅलोपॅथी औषधे रुग्णांना पुरविण्यासाठी विकत घेतली जात आहेत. तसेच, 650 ते 700 प्रकारचे सर्जिकल साहित्य मागविले जाते. दर महिन्याला सरासरी 160 ते 180 प्रकारची औषधे मागविण्यात येतात. महापालिकेची 8 रुग्णालये आणि 28 दवाखान्यांकडून ‘वायसीएम’मधील मध्यवर्ती औषध भांडार विभागाला औषधांची मागणी केली जात असते.

औषध भांडार विभागाकडे उपलब्ध औषधे रुग्णालयांना पुरविली जातात; मात्र जी औषधे उपलब्ध नाहीत, त्यांची मागणी महापालिका मध्यवर्ती भांडार विभागाकडे नोंदविली जाते. मध्यवर्ती भांडार विभागाकडून ही औषधे उपलब्ध झाल्यानंतर रुग्णालयांना पुरविण्यात येतात. या सर्व प्रक्रियेला दोन महिन्यांचा कालावधी लागतो. पर्यायाने ‘वायसीएम’ व महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधे मिळत नसल्याची रुग्णांची ओरड वाढत आहे. (समाप्त)

रुग्णालयांना प्रामुख्याने लागणारे वैद्यकीय साहित्य

मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांवरील औषधे
डायलेसीसचे वैद्यकीय साहित्य, वेदनाशामक गोळ्या
अपघाती रुग्णांवरील उपचारासाठी ड्रेसिंग साहित्य
शस्त्रक्रिया कक्षातील आवश्यक वैद्यकीय साहित्य

औषध पुरवठ्यात येणार्‍या अडचणी
डॉक्टरांना सुचविलेली विशिष्ट प्रकारची औषधे उपलब्ध नसणे.
ऑनलाइन यंत्रणेत वारंवार येणारा व्यत्यय ठरतो कारणीभूत.

मागणीनुसार औषधे मिळण्यास लागतो दोन महिन्यांचा कालावधी.
औषधांचा साठा करण्यासाठी अपुरी जागा असल्याने गरजेनुसारच मागविली जातात.
औषधे महासंघाचे मेडिकल चार महिन्यांपासून बंद.

पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे वायसीएम रुग्णालयातील मेडिकल चार महिन्यांपासून बंद.

जुन्या आणि नव्या कार्यकारिणीतील वादामुळे अद्याप या मेडिकलचा नव्या कार्यकारिणीला ताबा मिळालेला नाही.
येथे सर्वसामान्य नागरिकांना 10 टक्के तर, महापालिका कर्मचार्‍यांना 15 टक्के सवलतीत औषधे मिळतात.

वायसीएम रुग्णालयामध्ये आवश्यक औषधांची मागणी महापालिका मध्यवर्ती भांडार विभागाकडे नोंदविली जाते. त्यांच्याकडून वेळेत औषध पुरवठा न झाल्यास रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देता येत नाहीत.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण रुग्णालय पदव्युत्तर संस्था.

Back to top button