पुण्यात नवोदित अभिनेत्रीचा भररस्त्यात राडा; नागरिकांना शिवीगाळ करून महिला पोलिसाच्या बोटाला घेतला चावा | पुढारी

पुण्यात नवोदित अभिनेत्रीचा भररस्त्यात राडा; नागरिकांना शिवीगाळ करून महिला पोलिसाच्या बोटाला घेतला चावा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मुंबईहून पुण्यात आलेल्या एका नवोदित अभिनेत्रीने हॉटेलचालकाशी वाद झाल्याने भरस्त्यात नागरिकांना शिवीगाळ करून राडा घातल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. दरम्यान तिला समजावून सांगणार्‍या महिला पोलिसाच्या बोटाला देखील तिने चावा घेतला. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच महिला पोलिसाच्या बोटाला चावा घेतल्या प्रकरणी संबंधित नवोदित अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. काकुली बिश्वास (वय 28, सध्या रा. अंधेरी, मुंबई, मूळ रा. बंगळुरू) असं अभिनेत्रीचं नाव आहे. याबाबत महिला पोलीस शिपाई परवीन शेख यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काकुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकुली नवोदित अभिनेत्री आहे. तिने काही वेबसिरीजमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. ती कामाच्या शोधात असून ती पुण्यात कामानिमित्त आली होती. तिने वडगाव शेरी परिसरातील एक हॉटेलमधील खोली ऑनलाइन बुक केली होती. खोलीतील सुविधा तिला आवडल्या नाहीत. त्यामुळे तिने बुकिंग केलेले पैसे परत मागितले. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापनाने पैसे परत देण्यास नकार दिला. या कारणावरुन तिने हॉटेलमधील कर्मचार्‍यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती हॉटेल व्यवस्थापनाने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या दामिनी पथकातील महिला पोलीस तेथे गेल्या. त्यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. हॉटेलसमोरील रस्त्यावर गोंधळ घालणार्‍या काकुलीला महिला पोलिसांनी गाडीत बसण्यास सांगितले. त्यावेळी दामिनी पथकातील पोलीस कर्मचारी परवीन शेख यांच्याशी वाद घालून झटापट केली. तिने शेख यांच्या बोटाचा चावा घेतला. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच दुखापत केल्याप्रकरणी तिला अटक करणात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मुळुक यांनी दिली.

Back to top button