पिंपरी: वंचित बहुजन आघाडीला येणार महत्त्व | पुढारी

पिंपरी: वंचित बहुजन आघाडीला येणार महत्त्व

पिंपरी: पुढारी वृत्तसेवा : राज्यातील राजकीय घडामोडीत शिवसेनेतील शिंदे गटाने व भाजपने सत्ता स्थापन केली आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत ओबीसींना आरक्षण न मिळाल्याने ओबीसी नेते आणि इच्छुक हे वंचित बहुजन आघाडीकडे वळणार असल्याचे राज्यातील सध्याच्या घडामोडीमुळे महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार असल्याचे दिसून येते; तसेच ओबीसी वर्गाची काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप आदी पक्षावर नाराजी दिसून येत आहे.

परिणामी वंचित आघाडीचे महत्व येत्या निवडणूकीत वाढू शकते. असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. तसेच पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच औरंगाबाद येथे बैठक घेऊन स्थानिक निवडणुकीमध्ये युती आघाडी करण्याचे अधिकार शहराध्यक्ष व जिल्हा प्रभारी यांना देण्यात आल्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची कोंडी होता, होता वाचली आहे. अशी चर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. या निर्णयाचा फायदा स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीची शहरात संघटनात्मक बांधणी झाली आहे. स्वतंत्र निवडणुका लढण्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यामुळे आम्हाला मनपा निवडणुकीत फार मोठी स्पेस निर्माण झाली आहे. ज्यांना आतापर्यंत राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाही अश्या छोट्या समूहाला, संघटनांना, पक्षाला सोबत घेऊन त्या संधीचा पुरेपूर फायदा वंचित बहुजन आघाडी घेणार आहे.
– देवेंद्र तायडे, शहराध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी.

Back to top button