पिंपरी : शहर भाजपचे बळ वाढणार? | पुढारी

पिंपरी : शहर भाजपचे बळ वाढणार?

पिंपरी : राज्यात शिवसेना बंडखोर आमदारांचा गट आणि भाजप यांची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला बळ मिळणार असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे. शहरात भाजपचे दोन आमदार आहेत. तर, नव्याने महिला आमदार उमा खापरे यांना विधानपरिषदेवर संधी मिळाल्याने शहरातील भाजपची ताकद वाढली आहे. त्याचा निश्चितच महापालिका निवडणुकांमध्ये फायदा होईल, अशी कार्यकर्त्यांची धारणा आहे.

महापालिकेत भाजपचे 2012 मध्ये केवळ 3 नगरसेवक निवडून आले होते. तर, मनसेचे 4 नगरसेवक होते. म्हणजे, भाजपपेक्षाही मनसेकडे त्यावेळी एक नगरसेवक जास्त होता. 2017 च्या निवडणुकीत मात्र भाजपचे पारडे जड झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला नामोहरम करत भाजपचे उमेदवार 77 जागांवर निवडून आले. पाच अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने भाजपने महापालिकेत सत्तांतर घडविले. त्यानंतर आता येत्या काही महिन्यांमध्ये महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लागण्याची शक्यता आहे.

महिला उमेदवारांना बळ

भाजपकडे भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांचे पाठबळ आहे. त्या पाठोपाठ आता पक्षीय नेतृत्वाने विश्वास दाखवत विधान परिषदेवर भाजप नेत्या उमा खापरे यांना संधी दिली आहे. त्यामुळे शहरात भाजपला तीन आमदार मिळाले आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षण हे महिलांना आहे. अशा परिस्थितीत महिला आमदार देऊन नेतृत्वाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी इच्छुक महिला उमेदवारांना बळ देऊ केले आहे.

राज्यातील सत्ता परिर्वतनाचा फायदा

राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे. शिवसेना बंडखोर आमदारांचा गट आणि भाजप यांची सत्ता आल्यानंतर त्याचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये उमटू शकतात. भाजपची स्थानिक पातळीवर ताकद वाढविण्यासाठी नेतृत्वाकडून त्यासाठी आवश्यक फायदा करुन घेण्यात येऊ शकतो. महापालिकेच्या विविध योजनांसाठी मंजुरी मिळविणे, आवश्यक निधी उपलब्ध करणे आदींसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. त्याशिवाय, शहरात भाजपची ताकद वाढविण्यासाठी देखील यामुळे उपयोग होईल, असे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे.

राज्यमंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न
पिंपरी-चिंचवड शहरात भाजपच्या माध्यमातून मंत्रीपद मिळावे, यासाठी स्थानिक नेतृत्वाचे प्रयत्न आहेत. कॅबिनेट मंत्रीपद नाही तर किमान राज्यमंत्री पद तरी मिळेल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. आमदार महेश लांडगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांच्या समवेत असलेली जवळीक लक्षात घेता तसेच, शहरात मंत्री पद देऊन भाजपची ताकद वाढविण्यासाठी लांडगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. आमदार लांडगे यांना संधी न मिळाल्यास अन्य दोन आमदारांपैकी कोणालाही संधी देऊन शहरात मंत्रीपद द्यायला हवे, अशी भूमिका कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवत आहेत.

राज्याप्रमाणे शहरातही समीकरण शक्य
शिवसेनेत सध्या स्थानिक पातळीवर दुफळी पडलेली नाही. मात्र, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जर पक्षात
फूट पडली तर एक गट भाजपसोबत जाऊ शकतो. त्यामुळे निवडणुकांमध्ये वेगळे राजकीय समीकरण निर्माण होऊ शकते. महापालिकेतील सत्तेसाठी असे नवे समीकरण तयार झाल्यास भाजपसाठी ती अनुकूल बाब ठरू शकते.

Back to top button