खेड तालुक्यात अवैध धंदे फोफावले | पुढारी

खेड तालुक्यात अवैध धंदे फोफावले

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्याच्या एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनच्या क्षेत्रातील गावांत अनेक अवैध धंदे सुरू झाले आहेत. दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू असलेल्या धंद्याबाबत पोलिसांचा कानाडोळा झाला आहे. या भागातील गावांचे सरपंचांनी अनधिकृत धंदे बंद व्हावेत अशी मागणी केली आहे. एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमध्ये सावरदरी, भांबोली,वराळे, शिंदेगाव, वासुली, खालुंब्रे, आंबेठाण आदी गावच्या परिसरात ढाबा व हॉटेलच्या नावाखाली बेकायदेशीर दारू विक्रीचे धंदे सुरू आहेत. काही ठिकाणी तर चक्क वेश्याव्यवसाय सुरू असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

गावच्या रस्त्याच्या कडेला जागोजागी भंगाराची दुकाने असून चोरून आणलेला लोखंड व पत्रा येथील दुकानात सर्रास विकला जातो. अनेकवेळा चोरीतील माल भंगाराचे दुकानात पोलिसांनी जप्त केल्याची घटना घडली आहे. एमआयडीसी क्षेत्रातील प्रत्येक गावच्या हद्दीत शेकडो अनधिकृत दारू विक्रीची दुकाने आहेत. भांबोली गावचे सरपंच भरत लांडगे यांनी सांगितले की, एमआयडीसीकडून भूखंड मिळाल्यावर जागा मालकाने बांधकाम करून व्यवसाय उभारले आहेत. ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम उभारले, परंतु सदर बांधकामाची नोंद मात्र ग्रामपंचायत दप्तरी नाही.

त्यांना मात्र वीज, पाणी, रस्ता अशा अनेक सुविधा ग्रामपंचायतकडून मिळतात.परंतु ग्रामपंचायतीला काहीच फायदा होत नाही. म्हणून त्यांच्या बांधकामांच्या नोंदी होणे महत्त्वाचे आहे. तसेच त्यांनी उभारलेल्या जागेत काय व्यवसाय सुरू आहेत हेही ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती नाही. पोलिस प्रशासनाने अनधिकृत धंद्याबाबत कडक भूमिका घेऊन सदरचे धंदे गावातील वातावरण शांतता ठेवण्याच्या दृष्टीने तत्काळ बंद करावेत, अशी मागणी सरपंच भरत लांडगे यांनी आहे.

Back to top button