‘निरा-देवघर’च्या कालव्यात चहाची पाकिटे; नागरिकांचे आरोग्य धोक्यात; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष | पुढारी

‘निरा-देवघर’च्या कालव्यात चहाची पाकिटे; नागरिकांचे आरोग्य धोक्यात; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

भोर : पुढारी वृत्तसेवा: निरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्यात एक पोते भरेल एवढी ग्रीन टी चहाची पाकिटे टाकण्यात आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याची चर्चा नागरिकांत आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. भोर शहरालगत कालव्यात अज्ञात व्यक्तीने ही चहाची पाकिटे टाकली आहेत. या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे मुदत संपलेला असा उल्लेख नसून कालव्याच्या दोन्ही बाजूने ही पाकिटे विस्कटलेली अवस्थेत पडली आहेत.

कालव्याला आवर्तन सुटल्यावर ही पाकिटे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन पाणी दूषित होऊ शकते. कालव्याच्या दोन्ही बाजूने हिरवा चारा तयार झाला असल्यामुळे जनावरे चरण्यासाठी जात असून, ही ग्रीन टी चहाची पाकिटे जनावरे खाण्याची शक्यता आहे. या कालव्यातील पाणी हे पूर्व पट्ट्यातील गावांना शेतीला, पिण्यासाठी जात असल्यामुळे या ग्रीन टी पाकिटांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका होऊ शकतो.

भोर शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत कचरा गाड्यातून ओला-सुक्या कचर्‍याचे संकलन केले जाते, परंतु काही अज्ञात व्यक्ती शहराच्या आजूबाजूला कचरा, कोंबड्याची पिसे, प्लॅस्टिक पिशव्या टाकून ढीग करत असतात. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

                                                     – महेंद्र बांदल, आरोग्य विभाग, भोर न.पा.

Back to top button