राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत नवीन अधिसभा होणार तयार | पुढारी

राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत नवीन अधिसभा होणार तयार

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील सर्व अधिसभांचा कार्यकाळ हा 31 ऑगस्टपर्यंत आहे. संबंधित सर्व विद्यापीठांमध्ये येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत नवीन अधिसभा तयार होणार आहेत. राज्यातील विद्यापीठांमध्ये अधिसभेचे वारे वाहायला लागले असून, येत्या काळात अधिसभेचे राजकारण चांगलेच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची निवडणूकप्रक्रिया 1 जून 2022 पासून सुरू झाली असून, महाराष्ट्र अधिनियम 2016 कलम 62 नुसार नवीन प्राधिकरणांची मुदत 1 सप्टेंबर 2022 पासून पुढील पाच वर्षांकरिता असणार आहे.

त्यासाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध प्रवर्गांसाठी नोंदणी करायची आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेत अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य आणि विद्या परिषद सदस्यांचा सहभाग असतो. पुणे विद्यापीठाचा विचार केला, तर विद्यापीठात 23 व्यवस्थापन परिषद सदस्य, 72 अधिसभा सदस्य, तसेच 100 हून अधिक विद्या परिषदेचे सदस्य आहेत. या सर्व सदस्यांची मुदत 31 ऑगस्ट रोजी संपणार असून, त्याठिकाणी नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, राजकीय निवडणुकांमध्ये जसे गट-तट शह-काटशहाचे राजकारण पाहायला मिळते तसेच राजकारण अधिसभेच्या निवडणुकांमध्येदेखील पाहायला मिळणार आहे.

पुणे विद्यापीठाची प्रशासकीय व्यवस्था ही लोकशाही मूल्ये आणि शैक्षणिक गुणवत्ता याच्या समतोलावर आधारित आहे. तर, समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व असलेली अधिसभा ही समाजाच्या आकांक्षेचे प्रतिबिंब असते. नवीन अधिसभेतील विविध प्रवर्गातील सदस्यांची निवड येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे. त्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

                  – प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

Back to top button