बिबट्यांच्या पिलांच्या अफवेने खळबळ | पुढारी

बिबट्यांच्या पिलांच्या अफवेने खळबळ

कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे मागील काही दिवसांपासून अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. काही बिबटे पिंजर्‍यात जेरबंद झाले आहेत. अशातच शुकवारी (दि.1) सकाळच्या सुमारास शेतात काम करणार्‍या लोकांना बिबट्यासदृश प्राण्याची पिल्ले दिसून आल्याने खळबळ उडाली. वढू बुद्रुक येथील आदित्य भंडारे यांच्या उसाच्या शेतात काही नागरिक काम करत असताना त्यांना बिबट्यासदृश प्राण्याची पिल्ले दिसून आली.

वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरूर तालुका सचिव शेरखान शेख यांनी याबाबत शिरूर वनविभागाला कळवले. वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता तेथे आढळून आलेली पिल्ले बिबट्याची नसून रानमांजराची असल्याचे निष्पन्न झाल्याने शेतकर्‍यांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु गावामध्ये अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. काही नागरिकांवर हल्ले केलेले असल्याने घाबरून गेल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. आढळून आलेल्या पिलांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन वनरक्षक बबन दहातोंडे यांनी केले आहे.

Back to top button