सोंडेकरवस्ती रस्ता कामाचा प्रारंभ | पुढारी

सोंडेकरवस्ती रस्ता कामाचा प्रारंभ

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : आसखेड बुद्रुक (ता.खेड) येथील शेतकर्‍यांनी रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने सोंडेकरवस्तीपासून दर्‍यापर्यंत जाणार्‍या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे हस्ते झाला.
शेतकर्‍यांच्या मागणीनुसार दर्‍यापर्यंत जाणार्‍या रस्त्याच्या कामासाठी निधी शरद बुट्टे पाटील यांनी दिल्याने दि.29 रोजी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.

यावेळी कोरेगावचे उपसरपंच रोहित डावरे पाटील, आसखेड बुद्रुकच्या सरपंच ताईबाई सप्रे, उपसरपंच प्रमिला गाडे, आशा सोंडेकर, सुदाम सोंडेकर, पांडुरंग सोंडेकर, बाबाजी सोंडेकर आदी उपस्थित होते. आसखेड बुद्रुक गावच्या उत्तरेला सोंडेकरवस्ती आहे. परंतु, या वस्तीपासून दर्‍यापर्यंत जाण्यासाठी पक्का व हक्काचा रस्ता नव्हता.

कायमस्वरूपी पक्का रस्ता व्हावा अशी येथील शेतकर्‍यांची अनेक वर्षाची मागणी होती. रस्ता करण्याचे आश्वासन बुट्टे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी सोंडेकरवस्तीपासून दर्‍यापर्यंत जाणार्‍या रस्त्याचे काम सुरू केले. काम सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला.रस्त्याच्या कामासाठी शेतकर्‍यांनी कसलाही मोबदला न घेता जागा दिल्याने रस्त्याचे काम सुरू केले. विकास प्रक्रियेला सहकार्य केल्याने आता सोंडेकरवस्तीसह परिसरातील शेतकर्‍यांना या रस्त्याचा उपयोग होणार असल्याचे बुट्टे पाटील यांनी सांगितले.

Back to top button