येडगावला 55 कृषी पंपांच्या केबलची चोरी | पुढारी

येडगावला 55 कृषी पंपांच्या केबलची चोरी

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या येडगाव (इंदिरानगर) येथील 55 कृषी पंपांच्या तांबे धातूच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. गुरुवारी (दि.30) पहाटे ही घटना घडली असून या केबलची किंमत अंदाजे 8 ते 10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. इंदिरानगर, गणेशनगर, कैलासनगर, हांडे मळा येथील कृषी उपसा करणार्‍या व नळ पाणीपुरवठा करणार्‍या वीज मोटारी येडगाव जलाशयात आहेत.

प्रत्येक मोटारीला शंभर ते दीडशे मीटर लांबीची तांब्याची केबल जोडलेली असते. चोरटे या केबल चोरून त्यातील तांबे काढून ते भंगारवाल्यांना विकून पैसे मिळवतात. यापूर्वीही या परिसरात अनेकदा कृषी पंपाच्या केबलची चोरी झालेली आहे. केबल व कृषी पंप चोरीला गेल्याच्या तक्रारी यापूर्वी येथील शेतकर्‍यांनी नारायणगाव पोलिस स्टेशनला दिल्या आहेत.

पोलिसांनीही चोरट्यांना पकडले होते. केबल चोरीसाठी हे चोरटे नवीन फंडा वापरत असून रात्री पोलिस गस्तीची गाडी निघून गेल्यानंतर किंवा भल्या पहाटे केबल चोरी करत आहेत. पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी प्रकाश नेहरकर, शिवाजी नेहरकर, सचिन नेहरकर, वैभव भिसे, जयसिंग भिसे यांनी केली आहे. पुढील काळात येडगाव परिसरात पुन्हा केबल चोरीच्या घटना घडल्या तर येथील शेतकर्‍यांनी पोलिस स्टेशनसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नारायणगाव पोलिसांनी यापूर्वी येडगाव परिसरात चोरीला गेलेले कृषी पंप तसेच केबल चोरी करणार्‍या चोरट्यांना पकडले होते. चोरट्यांकडून हस्तगत विद्युत मोटारी शेतकर्‍यांना परत दिल्या असून येडगाव परिसरातील ग्रामपंचायतीने ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. भागात सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्यास अशा प्रकारच्या चोरीवर अंकुश मिळवता येईल. नुकतीच केबल चोरी झालेल्या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर पकडू.
– पृथ्वीराज ताटे, सहायक पोलिस निरीक्षक, नारायणगाव

Back to top button