धरणातील मंदिरे, गावठाणांचे होऊ लागले दर्शन; खडकवासला साखळीत अवघा 8.80 टक्के साठा

धरणातील मंदिरे, गावठाणांचे होऊ लागले दर्शन; खडकवासला साखळीत अवघा 8.80 टक्के साठा
Published on
Updated on

दत्तात्रय नलावडे

वेल्हे : पुणे शहर व जिल्ह्यातील हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यांना पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला साखळीच्या धरणक्षेत्रात 1972 च्या दुष्काळापेक्षाही भीषण दुष्काळाचे सावट उभे आहे. जून महिना संपूनही जोरदार पाऊस पडणार्‍या रायगड जिल्ह्यालगतच्या पानशेत, वरसगाव धरणक्षेत्रात पावसाअभावी नद्या, नाल्यांसह धरणांचे बहुतांश पाणलोट क्षेत्र कोरडे ठणठणीत आहे. गुरुवारी (दि.30) सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत केवळ 8.80 टक्के म्हणजे अवघे 2.57 टीएमसी पाणी उरले होते. गेल्या वर्षी याच दिवशी 29.54 टक्के म्हणजे जवळपास चारपट अधिक पाणीसाठा होता.

टेमघरपाठोपाठ वरसगाव, पानशेत धरणांनी तळ गाठल्याने पाण्यात बुडालेल्या शिवकालीन वास्तू, मंदिरे, गावठाणांचे दर्शन होत आहे. खडकवासला धरणाचेही बहुतांश पाणलोट क्षेत्र उघडे पडले आहे. मांडवी, खानापूर, मालखेड, सांगरुण आदी ठिकाणी धरणातील मूळ नदीपात्रासह ब्रिटिश राजवटीत धरणात बुडालेल्या वास्तूंच्या भग्नावशेषांचे दर्शन होत आहे वरसगावचे पाणलोट क्षेत्र दासवे तवपासून मोसे बुद्रुक, साईवपर्यंत उघडे पडले आहे. तर पानशेतचे पाणलोट क्षेत्र कोशीमघर भालवडीपर्यंत उघडे पडले आहे. वरसगाव धरण खोर्‍यातील मोसे बुद्रुक येथील स्वराज्याचे सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे जन्मस्थळ, मंदिर, गावठाणाचे चिरेबंदी दगडी अवशेष दिसत आहेत.

वरसगावमध्ये बुडालेली आडमाळ, पाथरशेत, पडळघर, वडवली आदी गावठाणांचे अवशेष उघडे पडले आहेत. दासवे येथील जुन्या गावठाणातील विहीर, नदीचे पात्र, गावठाणाचे अवशेष तसेच शिवकालीन वास्तूंचे भग्न अवशेष सहज नजरेस पडत आहेत. वडवली येथील शिवकालीन मारुती, सोमजाई मंदिराचे अवशेष, काही देवतांच्या मूर्ती, दगडी बांधकाम़ाचे अवशेष दिसत आहेत. धरणात बुडालेली मंदिरे, वास्तू, घरांचे अवशेष पाहत खेड्यापाड्यातील धरणग्रस्त जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news