पारंपरिक खेळांतून जपला जातोय फिटनेस | पुढारी

पारंपरिक खेळांतून जपला जातोय फिटनेस

पुणे: पुढारी वृत्तसेवा: नियमित व्यायाम न करण्यासाठी स्त्रियांकडे अनेक कारणे असतात. मात्र सणासुदीच्या दिवसांमध्ये स्त्रिया पारंपरिक खेळ आवडीने खेळत असतात. त्यातून त्या फिटनेस जपत असल्याचेही दिसून येत आहे. मंगळागौरीत खेळले जाणारे खास स्त्रियांचे खेळ हे महाराष्ट्राचे मोठे सांस्कृतिक संचित आहे. लहान मुलींपासून ते साठी ओलांडलेल्या आजींपर्यंत सर्वच वयोगटांतील स्त्रिया यात उत्साहाने सहभागी होत असतात. या खेळाचा सराव करत पुण्यातील महिलांनी त्यांचे आरोग्य तर जपलेच आहे, त्याचबरोबर गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुलींना मदत करण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी मंगळागौरीच्या कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.

निरामय संस्थेच्या किशोरी शक्ती प्रकल्पाअंतर्गत संस्थेच्या मुलींना शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी क्षितिजा आगाशे आणि राणी थोपटे यांनी 15 वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू केला. मंगळागौरी, नागपंचमी, हरितालिका, गणेशोत्सव, नवरात्र काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नेहमीच केले जात असते. सणांमध्ये पारंपरिक तसेच आधुनिक खेळांचे दिमाखदार सादरीकरण करण्यासाठी निरामय किशोरी शक्ती प्रकल्पामधील मुली आता सज्ज झाल्या आहेत. निरामय संस्थेच्या किशोरी शक्ती प्रकल्पाचा हा उपक्रम असून दीपा कुलकर्णी त्याच्या प्रमुख समन्वयक आहेत. स्नेहमेळावे, विविध सांस्कृतिक मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, मंदिरे अशा विविध ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

आर्थिक मदत शिक्षणासाठी वापरणार
आगाशे म्हणाल्या, ‘गरजू मुलींना मंगळागौरीच्या खेळांचे प्रशिक्षण देऊन आणि कार्यक्रम स्वीकारून त्यातून होणारी आर्थिक मदत त्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी वापरायची असा सामाजिक हेतू त्यामागे आहे. पारंपरिक खेळाद्वारे महिला आपले आरोग्य उत्तमरीत्या जपत असल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे.’

Back to top button