पिंपरी : डॉक्टरकडून लाच घेणार्‍या महिला पोलिस अधिकार्‍यास अटक | पुढारी

पिंपरी : डॉक्टरकडून लाच घेणार्‍या महिला पोलिस अधिकार्‍यास अटक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : डॉक्टरकडून दोन लाखांची लाच घेणार्‍या महिला पोलिस अधिकार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. गुरुवारी (दि. 30) निगडी येथे ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक नलिनी शंकर शिंदे (नेमणूक : मालवण, सिंधुदुर्ग) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर महिला अधिकार्‍याचे नाव आहे.

याप्रकरणी 62 वर्षीय महिला डॉक्टरने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला डॉक्टर असून त्यांचे निगडी येथे सोनोग्राफी सेंटर आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग येथील मालवण पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपी नलिनी शिंदे निगडी येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली.

त्यानंतर तडजोडीअंती दोन लाख रुपये स्वीकारले. त्यावेळी लाचलुचपत विभागाने नलिनी शिंदे यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.

Back to top button