उजनी धरणाचा पाणीसाठा उणे 11 टक्के

उजनी धरणाचा पाणीसाठा उणे 11 टक्के
Published on
Updated on

भिगवण : पुढारी वृत्तसेवा: उजनी धरणाचा पाणीसाठा पुणे धरण क्षेत्रात पडणार्‍या पावसावर अवलंबून असतो. यंदा जून संपला तरी धरण क्षेत्रात म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे उजनीकरांची धाकधुक वाढू लागली आहे. उजनीचा पाणीसाठा उणे 10.99 टक्क्यांवर आला आहे. आषाढी वारीनंतर तो आणखी कमी होणार आहे. जून महिन्यात पुण्याच्या डोंगरमाथ्यावर समाधानकारक पाऊस पडत असल्याने खडकवासला, पानशेत, डिंभे, वरसगाव, टेमघर, पवना या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागते व जुलै, ऑगस्टच्या पावसात ही धरणे ओसंडून वाहतात. त्यानंतर उजनी धरण भरते.

परिणामी पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटतो. 117 टीएमसी पाणीसाठा असलेले राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे धरण म्हणून उजनीची ओळख आहे. सध्या उजनीचा पाणीसाठा नीचांकीकडे वाटचाल करू लागला आहे. त्यामुळे उजनीकरांची धडधड वाढू लागली आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस पडलेला नाही. पुणे धरण साखळी क्षेत्रातही म्हणावा तसा पावसाचा जोर नसल्याने यंदा उजनी भरणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उजनीचा पाणीसाठा उणे 10.99 टक्क्यांवर आला असून, पंढरीच्या वारीसाठी आतापासूनच एक हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. वारी जसजशी सोलापुरात मार्गस्थ होईल तसा विसर्ग वाढवण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आषाढी वारीनंतर उजनीचा पाणीसाठा कमालीचा घटण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पुणे धरण साखळी क्षेत्रातील पावसाकडे उजनीकरांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news