मे महिन्याचा पगार सुरक्षारक्षकांना नाहीच; महापालिकेच्या नोटिशीनंतरही वेतन रखडले | पुढारी

मे महिन्याचा पगार सुरक्षारक्षकांना नाहीच; महापालिकेच्या नोटिशीनंतरही वेतन रखडले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या सुरक्षारक्षकांना जून महिना संपत आला तरीही अद्याप मे महिन्याचे वेतन मिळालेले नाही. महापालिकेच्या मालकीच्या मिळकती, दवाखाने, उद्यान, कार्यालये आदी ठिकाणी कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली गेली आहे. सुमारे 32 कोटी रुपयांचे हे कंत्राट मे. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला दिले आहे. ही कंपनी भाजपच्या बड्या नेत्याची असून, केवळ दबावापोटी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने या कंपनीचा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप प्रस्ताव मंजुरीच्यावेळी विरोधकांकडून झाला होता.

या कंपनीच्या मार्फत पंधराशे कंत्राटी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत कंपनीकडून सुरक्षारक्षकांना वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र, कराराचे उल्लंघन होत असून, सुरक्षारक्षकांना वेतन मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. या कंपनीने सुरक्षारक्षकांना एप्रिल व मे महिन्याचा पगार थकविल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची नोटीस महापालिकेने बजावली होती. त्यानंतर 25 जूनपर्यंत सर्व कर्मचार्‍यांचे पगार दिले जातील, असे कंपनीकडून आश्वासन दिले होते. एप्रिल महिन्याचे वेतन दिले मात्र, जून महिना संपत आला तरी सुरक्षारक्षकांना मे महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही.

Back to top button