पिंपळे गुरव : वाकड-भोसरी बीआरटी मार्ग बनला मृत्यूचा सापळा | पुढारी

पिंपळे गुरव : वाकड-भोसरी बीआरटी मार्ग बनला मृत्यूचा सापळा

पिंपळे गुरव : वाकड-भोसरी बीआरटीएस रस्ता ओलांडताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. रस्ता ओलांडताना अपघात होऊन आतापर्यंत तीन नागरिकांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या रस्त्यावर नेहमी अवजड वाहनांची वर्दळ असते. याच रस्ताच्या एका बाजूला पिंपळे गुरव परिसरातील सुदर्शन चौक ते कल्पतरु इस्टेट नागरी वसाहत आहे.

तर, दुसर्‍या बाजूला काशीद पार्क, निसर्ग कॉलनी, महाराष्ट्र कॉलनींसह अन्य सोसायट्या आहेत. रस्त्याच्या एका बाजूकडून दुसर्‍या बाजूचा रस्ता ओलांडताना अपघात होत आहेत. आतापर्यंत तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते आहे. येथील स्थानिकांना रस्ता ओलांडणसाठी ना भुयारी मार्ग उपलब्ध आहे ना संध्याकाळी वाहतूक नियंत्रक दिवे चालू असतात.

त्यामुळे या मार्गावर उपाययोजना करण्यासाठी काशीद पार्कमधील स्थानिकांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. परंतु, अजूनही महापालिका बघ्याची भूमिका का घेत आहे? असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
बीआरटीएस वाकड-भोसरी रस्त्यावर प्रचंड प्रमाणात सकाळ आणि संध्याकाळी वाहनाची वाहतूक होत असते. त्यातून सकाळच्यावेळी मुलांना शाळा, मंडई व अन्य कामासाठी जायचे असल्यास काशीद पार्क स्थानिकांना याच रस्त्याचा अवलंब करावा लागतो.

वाहतूक नियंत्रक दिवे काही वेळ सुरू केले जातात. परंतु, पुन्हा वाहतूक नियंत्रक दिवे बंद पडून पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे दिवसा आणि संध्याकाळी रस्ता ओलांडण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांना भरधाव वाहनांमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामतुळे ग्रेड सेपरेटर करण्याची मागणी स्थानिकांतून केली जात आहे.

बीआरटी वाकड-भोसरी रस्त्यावरील काशीद पार्क ते कल्पतरु इस्टेट रस्ता ओलंडणे धोकादायक झाले आहे. सिग्नल बंद असल्याने माझ्या दुचाकीला धडक बसली होती. या भागात वाहतूक नियंत्रक दिवे नियमित सुरू करावेत.
– गौरी कदम,
स्थानिक रहिवासी महिला

Back to top button