विद्यापीठात स्टार्टअपसाठी सीड फंड; अर्ज करण्याचे आवाहन | पुढारी

विद्यापीठात स्टार्टअपसाठी सीड फंड; अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ला स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत पाच कोटींचे बीज भांडवल (सीड फंड) प्राप्त झाले असून, या अंतर्गत निवडक स्टार्टअपना सीड फंड उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. ‘एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन’ ही स्टार्टअप विषयात काम करणारी सेक्शन 8 कंपनी असून या माध्यमातून स्टार्टअपला मार्गदर्शन करणे, नवउद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन करणे, स्टार्टअपला निधी उपलब्ध करून देणे आदी विषयात काम करते.

केंद्र सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ’सीड फंड स्कीम’च्या माध्यमातून फाउंडेशनला हा निधी प्राप्त झाला आहे. चांगल्या स्टार्टअपला बळ मिळावे, यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली गेली आहे. ‘या सीड फंडसाठी कोणतीही नोंदणीकृत कंपनी, गट किंवा स्वतंत्र व्यक्ती अर्ज करू शकते. यासाठीच्या पात्रतेच्या अटी https://seedfund.startupindia.gov.in/ या लिंकवर जाहीर करण्यात आल्या आहेत. संकल्पना, उत्पादन विकास, उत्पादन चाचण्या, बाजार प्रवेश आणि व्यापारीकरण या टप्प्यातील स्टार्टअपला यासाठी अर्ज करता येईल,’ अशी माहिती नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली.

डॉ. पालकर म्हणाल्या, ‘आलेल्या अर्जांची छाननी तज्ज्ञांच्या समितीमार्फत केली जाईल. अर्जदारांना 45 दिवसांच्या आत निकाल कळविला जाईल. निधीच्या 20 टक्के रक्कम ही सुरुवातीच्या टप्प्यावर असणार्‍या स्टार्टअपसाठी दिली जाईल तर उर्वरित स्टार्टअपला डिसेंबरमध्ये रूपांतरित निधी दिला जाईल. जे स्टार्टअप डीआयपीपी अंतर्गत नोंदणीकृत असतील त्यांनाच या फंडसाठी अर्ज करता येईल. दोन वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या कंपन्यांना यासाठी अर्ज करता येणार नाही.’

 

Back to top button