‘डब्ल्यूएचओ’त सुपरवायझरपदी नोकरी लावण्याच्या आमिषाने गंडा

‘डब्ल्यूएचओ’त सुपरवायझरपदी नोकरी लावण्याच्या आमिषाने गंडा

पुणेः पुढारी वृत्तसेवा: जागतिक आरोग्य संघटनेत (डब्ल्यूएचओ) जिल्हा व तालुका सुपरवायझरपदी नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुण-तरुणींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील दहा ते अकरा जणांची अशा प्रकारे फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ठगवणुकीचे हे जाळे राज्यात पसरले असल्याचीदेखील शक्यता आहे. शिवाजीनगर परिसरात ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली थाटलेले कार्यालय बंद करून पळ काढला तेव्हा हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात शिवशंकर बाहेकर नावाच्या व्यक्ती विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कर्वेनगर येथील 26 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे शिक्षण बी. कॉम.पर्यंत झाले असून, ती नोकरीच्या शोधात होती. फिर्यादीचा भाऊ कर्वेनगर येथील ऑप्टिमस इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षणासाठी जात होता. इन्स्टिट्यूट चालकाच्या माध्यमातून भावाला डब्ल्यूएचओच्या नोकरीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार फिर्यादी तरुणीने त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी आम्हाला जिल्हा सुपरवायझरची डीलरशीप मिळाली असून, आम्ही डब्ल्यूएचओमध्ये जिल्हा व तालुका सुपरवायझरची पदे भरीत आहोत. ट्रेनिंगसाठी 25 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. इन्स्टिट्यूट चालविणार्‍या दाम्पत्यानेदेखील सुपरवायझर पदासाठी पैसे भरल्याचे सांगितले.

सुरुवातीला भरलेल्या पैशातून लॅपटॉप व टॅब मिळणार असल्याचे सांगितले. फिर्यादी तरुणीने घरच्यांशी चर्चा करून इन्स्टिट्यूट चालवणार्‍या व्यक्तीने पाठविलेल्या क्यूआर कोडवर पैसे पाठवले. त्यानंतर फिर्यादी तरुणीच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून परीक्षा देण्यास सांगण्यात आले. तरुणीने परीक्षा दिल्यानंतर पोलिस व्हेरिफिकेशन करून घेण्यास सांगितले. त्यानुसार तरुणीने सर्व प्रक्रिया पार पाडल्या. हे सर्व झाल्यानंतर फिर्यादी तरुणीला ट्रेनिंगसाठी पुणे महापालिकेच्या पाठीमागे असलेल्या श्री कन्सल्टन्सी यांचे ऑफिस शशिकांत बिल्डिंग येथे बोलावले होते. तरुणी तेथे गेली तेव्हा अनेक तरुण-तरुणी तेथे आल्या होत्या.

त्यांनी चौकशी केली त्या वेळी इंगळे नावाच्या व्यक्तीने डब्ल्यूएचओमध्ये फ्रॉड झाला असून, तुम्हाला आयसीटी या सरकारी शाळेत नोकरी देऊ, असे सांगितले. मे महिन्यात नोकरी देण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, कालावधी लोटून गेला तरी त्यांना नोकरी मिळाली नाही. दरम्यान, फिर्यादी तरुणी परत तेथे चौकशीसाठी गेली होती. त्या वेळी शिवाजीनगर येथील कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. त्या वेळी तरुणीने कर्वेनगर येथील ऑप्टिमस इन्स्टिट्यूट चालविणार्‍या दाम्पत्यास संपर्क केला असता, त्यांनी जाहिरात पाहून पैसे पाठवल्याचे सांगितले.

परत फिर्यादी तरुणीने इंगळे यांना संपर्क केला, त्या वेळी त्यांनीदेखील आपली फसवणूक झाली असून, तेथील नोकरी सोडल्याचे सांगितले. अधिक माहिती घेतली तेव्हा शिवशंकर बाहेकर नावाच्या व्यक्तीने हा प्रकार केला असून, नोकरीच्या आमिषाने त्याने महाराष्ट्रातील अनेक तरुणांना आर्थिक गंडा घातल्याचे समजले. त्यानुसार फिर्यादी तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास वारजे पोलिस करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news