ईडीच्या कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा | पुढारी

ईडीच्या कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पाच वर्षांपूर्वी ईडी काय आहे हे कुणाला माहिती नव्हते. पण हल्ली खेड्यातला माणूसही भांडण झाले की म्हणतो तुझ्यामागे ईडीची चौकशी लावतो. ईडी विधिमंडळातील मोजक्याच लोकांची चौकशी करत आहे. मला प्राप्तिकर खात्याचे प्रेमपत्र आले आहे. माझी 2004 ते 2020 पर्यंतच्या सर्व निवडणुकांतील शपथपत्रांची चौकशी लावली आहे. याचा अर्थच असा आहे की, ईडीमध्ये गुणात्मक सुधारणा झाली आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील पत्रकार परिषदेत गुरुवारी केली.
राज्यात सत्ता परिवर्तन होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार पडताच शरद पवार यांनी पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी राज्यात झालेल्या सर्व घडामोडींवर भाष्य केले.

ते म्हणाले, ‘विशिष्ट लोकांचीच ईडीमार्फत चौकशी केली जात आहे. हा सर्व प्रकार गंभीर आहे. कारण ईडी काय हे कुणाला फारसे माहिती नव्हते. विधिमंडळातील काही मोजक्या सभासदांची चौकशी त्यांनी लावली. राजकीयदृष्ट्या ज्यांची मते वेगळी आहेत अशांच्या मागे ही चौकशी जणीवपूर्वक लावली जात आहे. मला नुकतेच आयकर विभागाचे पत्र आले आहे.’ पत्र दाखवत पवार म्हणाले, की माझी 2004 ते 2020 या कालावधीतील निवडणूक शपथपत्रांतील विवरणांची चौकशी लावली आहे. मला ते सर्व पाठ आहे त्यामुळे भीती वाटत नाही.

देवेंद्र नाखूष दिसत होते..
देवेंद्र फडणवीस यानी आनंदाने उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली, असे वाटत नाही. त्यांचा चेहराही सांगत होता ते नाखूष आहेत. पण नागपूरमध्ये त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. आदेश आल्यावर ते पाळायचे असतात, असा त्यांच्यावर संस्कार असावा. त्याचा परिणाम त्यांनी हे स्वीकारले, अस मत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत या वेळी व्यक्त केले. पवार यांनी यावेळी अनेक जुन्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, की पाच वर्षे ज्यांनी काम केले, नंतर विरोधी पक्षाचे नेतृत्व केले त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली हा आश्चर्याचा धक्का आहे. पण एकदा आदेश मिळाला आणि सत्तेची संधी मिळाली की ती स्वीकारायची असते, याचे उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी आज घालुन दिले आहे.

महाराष्ट्रात अशा घटना अनेक वेळा घडल्या..
एकदा मुख्यमंत्रिपदावर गेल्यानंतर अन्य पदे स्वीकारण्याची उदाहरणे महाराष्ट्रात यापूर्वी घडली आहेत. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो, पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा शंकरराव चव्हाण माझ्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते. नंतर मंत्री झाले. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, नंतर त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची ही स्वीकृती मला आश्चर्यकारक वाटली नाही, असे पवार यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी-काँग्रेसमुळे बाहेर पडलो हे सर्व खोटे आहे. त्याला अन्य कारणे असण्याची शक्यता आहे, असेही पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम केले. मात्र विधिमंडळाची सर्व सूत्रे एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्याने त्याचा गैरफायदा घेतल्याचे त्यांनी नमूद केले. संजय राऊतांनी राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली, तसेच तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी निधी दिला नाही त्यामुळे हे सगळे झाले काय, या प्रश्नावर पवार म्हणाले की हे सर्व खोटे आहे.

Back to top button