एक का डबल सांगून 35 लाखांना चुना; गुन्हे शाखेने दोघांना केली अटक | पुढारी

एक का डबल सांगून 35 लाखांना चुना; गुन्हे शाखेने दोघांना केली अटक

पुणेः पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील एका डांबर व्यावसायिकाला ‘एक का डबल’ करणे एक नव्हे, दोन नव्हे; तर तब्बल 35 लाख रुपयांना पडले आहे. पुणे व्हाया गुजरात भूज असा दौरा करून आल्यानंतर त्यांना 35 लाख रुपयांच्या बदल्यात भारतीय बच्चोंका बँक असे लिहिलेल्या नोटांची बॅग घेऊन बसण्याची वेळी आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सादिक मुबारक शेख (वय 56, रा. मुंढवा), जसविंदर ऊर्फ जस्सी तारासिंग गुणदेव (वय 55, रा. रविवार पेठ) या दोघांना अटक केली.

तर, जितेंद्र मेहता (रा. भरूच गुजरात) याच्या विरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबात असीफ नसीर खान (वय 52, रा. क्लोरअर टर्म सोसायटी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 22 मे ते 28 जून या कालावधीत घडली आहे. फिर्यादी खान यांचा डांबर आणि ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. खान यांचा एका मित्रामार्फत आरोपी शेख याच्याशी त्यांच्या मुंढवा येथील ऑफिसमध्ये परिचय झाला होता. त्या वेळी शेख याने ‘पाचशे रुपयांच्या नवीन एका सिरीजच्या नोटा आहेत. गुंतवणूक केल्यास तुम्हाला एका नोटेच्या बदल्यात दोन नोटा मिळतील,’ असे प्रलोभन दाखवले. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून खान गुंतवणूक करण्यास तयार झाले.

26 मे रोजी शेख हा जसवंदरसिंग याला खान यांच्या ऑफिसमध्ये घेऊन आला. जसविंदर याने जितेंद्र मेहता याचे नाव सांगून गुजरात येथून तो एकच्या बदल्यात दुप्पट देणार असल्याची थाप मारली. खान यांनी बँकेतून पैसे काढून 20 लाख रुपये शेख आणि जसविंदर या दोघांच्या हवाली केले. दुसर्‍या दिवशी डबल नोटा देण्याचे ठरले होते. खान यांनी दोघांना फोन केला तेव्हा त्यांना,‘आपल्याला गुजरातमध्ये भूज येथे जावे लागणार आहे. तुम्ही आणखी गुंतवणूक केली, तर मोठा फायदा होईल,’ असे सांगितले. खान पुरते दोघांच्या जाळ्यात अडकले होते. त्यांनी गुजरात येथे जाताना बरोबर पंधरा लाख रुपये घेतले.

तेथे गेल्यानंतर ते पैसे जितेंद्र मेहता नावाच्या माणसाने पाठवलेल्या व्यक्तीला दिले. त्याने मेहता याचे नाव सांगून नवीन नोटांची बॅग दाखवली. आरोपींनी पैसे तुमच्या ऑफिसला पोहोचतील, असे सांगितले. 8 जून रोजी जसविंदर हा एक बॅग खान यांच्या ऑफिसमध्ये ठेवून गेला. त्यांनी बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यामध्ये भारतीय बच्चोंका बँक, असे लिहिलेल्या खेळण्यातील नोटा मिळाल्या. खान यांनी आरोपींना फोन करून विचारले असता, चुकून बॅग आल्याचे सांगितले. त्याच वेळी आरोपींनी खान यांना आणखी पंधरा लाखांची मागणी करून एक कोटी देण्याचे प्रलोभन दाखवले.

ठगांना अशा ठोकल्या बेड्या
गस्तीवर असताना कर्मचारी शंकर नेवसे यांना लष्कर परिसरातील कुमार पॅव्हेलियन येथे दोन व्यक्ती 500 रुपयांच्या डबल सिरीजच्या नोटांचा व्यवहार करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक निरीक्षक विशाल मोहिते, उपनिरीक्षक नितीन कांबळे, कर्मचारी प्रमोद कोकणे, विनोद चव्हाण, निखिल जाधव, नागनाथ राख यांच्या पथकाने सापळा रचून दोघा संशियांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दोघांनी व्यावसायिकाला डबल नोटा देण्याचे प्रलोभन दाखवून 35 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे सांगितेल.

दोन वर्षांपूर्वी अशीच घटना…
जून 2020 मध्ये गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक आणि लष्कराने संयुक्त कारवाई करीत विमानतळ परिसरातून एक खोली भरेल एवढा खेळण्यातील नोटांचा साठा जप्त केला होता. बॉम्पे सॅपर्सच्या एका कर्मचार्‍यासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. फसवणूक करण्यासाठी अशा नोटांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.

Back to top button