

सुनील जगताप
पुणे : शासनाच्या धोरणानुसार खेळाडूंना मैदाने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने विभागीय आणि तालुका क्रीडासंकुलांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, पुण्याच्या विभागीय क्रीडासंकुलात चक्क सायकलचे शोरूम थाटले आहे. त्यामुळे क्रीडा विभागात 'दुकानदारी' सुरू झाली आहे का, असा प्रश्न खेळाडूंकडून उपस्थित केला जात आहे. येरवडा येथील विभागीय क्रीडासंकुलात जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, बॉक्सिंग आणि क्रिकेटसाठी काही अॅकॅडमी आणि संस्थांना भाडेतत्त्वावर मैदाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यामध्ये क्रिकेटसाठी अर्बन इन्फ्राकॉन या संस्थेबरोबर करार करण्यात आला असून, गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमी सुरू आहे.
संकुलाच्या वतीने मैदानाबरोबरच तीनमजली 474.69 स्क्वेअर फुटांचे तीन मजले, 678.12 स्क्वेअर फुटांच्या तळमजल्याचा एक हॉल आणि टेरेस देण्यात आलेला आहे. त्यासाठी महिन्याला तब्बल सहा लाख रुपयांचे भाडेही आकारले जाते. मात्र, या ठिकाणी क्रिकेटच्या प्रशिक्षणाबरोबरच सायकल विक्रीचा व्यवसाय, तर पहिल्या मजल्यावर जिमचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती खेळाडूंनी दिली. दरम्यान, या प्रकरणाबाबत अधिक माहितीसाठी अर्बन इन्फ्राकॉनच्या अधिकार्यांशी संपर्क साधला. मात्र, तो होऊ शकला नाही.
कर्मचार्यांची 'मेरी भी चुप तेरी भी चुप'
या संकुलातील सायकलच्या शोरूमबाबत किंवा जिमबाबत अधिक माहिती तेथील कर्मचार्यांना विचारली. मात्र, त्यांनी शोरूम सुरू झाले आहे का, असा प्रतिसवाल करीत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणावर कर्मचार्यांचा 'मेरी भी चुप, तेरी भी चुप' असा कारभार सुरू असल्याची चर्चा होत आहे.
येरवडा येथील विभागीय क्रीडासंकुलामध्ये गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमीला देण्यात आलेल्या जागेबाबत करार करण्यात आलेला आहे. या करारामध्ये नक्की कोणते मुद्दे घेण्यात आलेले आहेत, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. नक्कीच त्याबाबत योग्य तो
निर्णय घेऊ.
– प्रमोदिनी अमृतवाड, विभागीय उपसंचालिका, विभागीय क्रीडा संकुल