संतप्त चाकणकरांचा नगरपालिकेवर मोर्चा; विस्कळीत पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त | पुढारी

संतप्त चाकणकरांचा नगरपालिकेवर मोर्चा; विस्कळीत पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त

चाकण : पुढारी वृत्तसेवा: चाकणच्या विस्कळीत पाणीपुरवठ्याने हैराण झालेल्या नागरिकांनी अखेर बुधवारी (दि. 29) नगरपालिकेवर धडक देत नाराजी व्यक्त केली. या वेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रशासनाचा भोंगळ कारभार विस्कळीत पाणीपुरवठ्याला कारणीभूत ठरत असल्याचा नागरिकांचा रोष आहे. चाकणमधील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये पाण्याची बोंबाबोंब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

चाकण शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढल्याने काही वर्षांपूर्वीच चाकणची पाणीपुरवठा योजना कालबाह्य ठरलेली आहे, त्यातच अनेक तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा योजनेला अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने चाकणकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सद्यस्थितीत दरडोई दहा लिटर पाणी नागरिकांना पुरवणे ही पालिका प्रशासनाला अशक्य होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

चाकणची सुसाट वेगाने वाढती लोकसंख्या पाहता अखंडित, दररोज आणि पूर्ण दाबाने पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करण्याची नागरिकांची मागणी आहे. दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चाकण नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी सांगितले.

Back to top button