

टाकळी हाजी : शिरूर तालुक्यातील रावडेवाडी येथे काही दिवसांपूर्वी विकास सोसायटीची निवडणूक झाली, त्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटाकडून परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत, त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावडेवाडी येथील सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. या वेळी दोन्ही गटात विरोधात प्रचार करणार्यांविरोधात असंतोष खदखदत होता.
रविवार (दि. 26) दुपारी साडेबाराच्या सुमारास सोसायटीच्या निवडणुकीत विरोधात प्रचार केल्याच्या कारणावरून चिडून दोन गटांत हाणामारी झाली. या वेळी लोखंडी रॉड, काठ्यांचा वापर करण्यात आला. यात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे या भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता असल्याने स्थानिक नेत्यांनी मतभेद सामंजस्याने मिटवावे, अन्यथा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत याचे पडसाद उमटू शकतात, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.