“अजून बरंच काही बाकी आहे”, बहुमत चाचणी अगोदर अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट! | पुढारी

“अजून बरंच काही बाकी आहे”, बहुमत चाचणी अगोदर अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट!

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देत ३० जून रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन देखील बोलावलं आहे. त्यामुळे येणाऱ्या ४८ तासांत राज्यात नेमकं काय घडणार? याविषयी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट आणि भाजपाकडून राज्य सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे. तर शिवसेनेकडून मात्र बहुमत चाचणीला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी दिलेले आदेश घटनाबाह्य असल्याचा दावा करणारी याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक शब्दांत केलेल्या ट्वीटमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

मंगळवारी रात्री उशिरा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. त्यानंतर बुधवारी सकाळी राज्यपालांनी बहुमत चाचणीसंदर्भात निर्देश काढले. यासाठी ३० जून रोजी विधानसभेचं एका दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मात्र, राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे शिवसेना बंडखोर आमदार गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार बहुमत चाचणीला मुंबईत जाणार असून त्यात आमचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे राज्यातलं राजकारण चांगलंच ढवळून निघाले आहे.

राज्यपालांच्या निर्णयानंतर भाजपकडून ४८ तासांचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला जात आहे. या अल्टिमेटवर अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या “अति उतावीळ वऱ्हाडाला पाहुणचार म्हणून दगड गोटे मिळाल्याची घटना महाराष्ट्रात ताजी आहे. सरकार स्थापनेचा उतावीळपणा करत ’48’ तासाचा अल्टfमेटम देणाऱ्या उतावीळ नवऱ्यांनो…अजून बरच काही बाकी आहे” असं म्हटलं आहे.

तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुद्धा दडपणात असल्याचा दावा आमदार मिटकरींनी केला आहे. “महामहिम राज्यपाल महोदय दडपशाही खाली आहेत का? हे सुद्धा तपासले पाहिजे. इकडे सोळा आमदारांचा निर्णय अजूनपर्यंत होत नाही आणि बहुमत चाचणीचा आदेश एका रात्रीत निघतो, हे कसे? नक्कीच काहीतरी गडबड आहे”, असं अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Back to top button