

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वयंपाकासाठी घरगुती गॅसपुरवठा सुरू झाल्यानंतर पुणे शहर रॉकेलमुक्त झाले. त्यापाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही रॉकेल हद्दपार झाले आहे. गेल्या मे महिन्यात आंबेगाव आणि जुन्नरसाठी असणारा रॉकेलचा शेवटचा टँकरदेखील बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे ग्रामीण भागासह संपूर्ण पुणे जिल्हा रॉकेलमुक्त झाला आहे. घरगुती स्वयंपाकासाठी वापराबरोबरच दिवाबत्तीसाठी रॉकेलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून 1000 किलोलीटर रॉकेलचे वितरण केले जात होते. अनुदानित दराने मिळणारे रॉकेल घेण्याकडे रेशनिंग कार्डधारकांचा मोठा ओढा होता.
घरगुती गॅसचे वितरण वाढल्यानंतर पुरवठा विभागाने ज्या ग्राहकांकडे गॅस सिलिंडर आहे, त्यांच्या रेशनकार्डवर गॅस असल्याचा शिक्का मारण्यास सुरुवात करून त्यांचे रॉकेल वितरण बंद केले. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पाच वर्षांपूर्वी पुरवठा विभागाने रॉकेल वितरण बंद केले. मात्र, ग्रामीण भागात गॅसचा कमी-अधिक पुरवठा होत होता.
गेल्या वर्षी जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर आदिवासी भागात दहा किलोलीटर म्हणजे रॉकेलच्या एका टँकरमधून वितरण केले जात होते. पुरवठा विभागाने केलेल्या सर्वेक्षणात या क्षेत्रातील कुटुंबांकडेही गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत. उज्ज्वला योजनेतूनही गॅस उपलब्ध झाला आहे, त्यामुळे मे महिन्यापासून रॉकेल वितरण बंद केले आहे.
घरोघरी गॅस उपलब्ध झाल्याने आता पुणे जिल्ह्यात रॉकेलचे वितरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. आता एकाही दुकानदाराकडे रॉकेल वितरण होत नसल्याने त्यांचा परवाना जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी