पुणे : नगरसेवकांच्या चमकोगिरीला व उधळपट्टीला लगाम कधी लागणार ? | पुढारी

पुणे : नगरसेवकांच्या चमकोगिरीला व उधळपट्टीला लगाम कधी लागणार ?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध चौकांमध्ये आणि पदपथांवर माजी नगरसेवकांनी मुदत संपण्यापूर्वी आणि मुदत संपल्यावरही ‘आय लव्ह…’ असे डिजिटल नामफलक उभारले आहेत. हे फलक उभे करण्यास पथ विभाग किंवा विद्युत विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या चमकोगिरीला व उधळपट्टीला लगाम कसा लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिकेकडून शहरात विविध विकासकामे केली जात आहेत. विविध वास्तू आणि प्रकल्प उभारले जातात. ही कामे मुख्य खात्यांसह नगरसेवकांच्या विकासनिधीतूनही केली जातात. या ठिकाणी त्या-त्या विभागांकडून नामफलक लावले जातात. त्यानंतरही नगरसेवकांकडून संकल्पनेच्या नावाखाली पुन्हा स्वतःची नावे टाकून फलक लावले जातात. संकल्पनेच्या माध्यमातून पालिकेच्या पैशातून स्वतःसह पक्षाची, नेत्यांची फुकट प्रसिद्धी करवून घेतली जाते.

एकनाथ शिंदे गटाकडून आसाममधील पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत

मागील दोन वर्षांत तर ‘आय लव्ह …’ असे इलेक्ट्रॉनिक नामफलक चौकांमध्ये, रस्त्याच्या कडेला, पदपथावर उभे करण्याचे पेव फुटले आहे. येरवडा, कोरेगाव पार्क, मुंढवा, केशवनगर, वडगाव शेरी, स्वारगेट, सॅलिसबरी पार्क, कात्रज, कोंढवा, कोथरूड आदींसह शहराच्या विविध भागांत पदपथ अडवून ‘आय लव्ह…’ चे फलक उभारले आहेत. विशेष म्हणजे, हे फलक किंवा स्ट्रक्चर उभे करण्यासाठी याला वीज जोडण्यासाठी पथ विभाग, विद्युत विभाग यांची परवानगी घेणे आवश्यक असते.

मात्र, माजी नगरसेवकांनी क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकार्‍यांवर दबाव आणून विनापरवाना हे फलक उभारल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. सभागृहाची मुदत संपल्याने प्रशासनराजमध्ये अशा प्रकारच्या चमकोगिरीला आणि उधळपट्टीला लगाम बसेल, अशी अपेक्षा होती. मात्र, यावर काहीही परिणाम झाला नसल्याचे समोर आले आहे. अनधिकृतपणे उभे केलेले फलक आणि स्ट्रक्चर जागेवर डौलाने उभे आहे. उलट नगरसेवकपदाची मुदत संपल्यानंतरही काही ठिकाणी असे फलक उभे राहिल्याची अनेक उदाहरणे उजेडात आली आहेत. त्यामुळे या उधळपट्टीला व चमकोगिरीला कोण लगाम घालणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्वयंघोषित जनसेवक, लोकसेवकांचीही भर

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांची चमकोगिरी सुरू असताना आता यात स्वयंघोषित जनसेवक आणि लोकसेवकांचीही भर पडत आहे. कोणत्याही प्रकारचे संविधानिक पद न भूषविलेल्यांकडून जुन्याच मिळकतींवर व कामांवर संकल्पना म्हणून स्वतःची नावे टाकली जात आहेत. तसेच जागोजागी ‘आय लव्ह…’चे फलक उभे केले
जात आहेत.

कारवाईची डरकाळी फुसकीच

शहरात बेकायदा उभारलेल्या नामफलकांवर आणि ‘आय लव्ह…’ स्ट्रक्चरवर (ढाचा) कारवाई केली जाणार असल्याची डरकाळी गेल्या तीन महिन्यांपासून महापालिका अधिकार्‍यांकडून केली जात आहे. मात्र, ही डरकाळी फुसकीच निघाली आहे. तीन महिन्यांत नगरसेवकांनी उभारलेल्या एकाही नामफलकावर कारवाई झालेली नाही.

Back to top button