पुणे : दक्षता डोसचा वेग वाढविला | पुढारी

पुणे : दक्षता डोसचा वेग वाढविला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना वाढण्यास सुरुवात झाली. त्याबरोबरच थंडावलेल्या लसीकरणाने वेग घेतला असून, तिन्ही डोसपैकी सध्या दक्षता (बूस्टर) डोस घेणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. आठवडाभरात 24, 622 जणांनी दक्षता डोस घेतला आहे.

शहरातील 76 शाळांमध्ये 11 हजार 800 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याचे नियोजन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे. यासाठी केवळ दोन पथके असल्याने या लसीकरणाला म्हणावा तसा वेग आलेला नाही. शहरातील 73 हजार 284 आरोग्य कर्मचार्‍यांनी पहिला, 66 हजार 337 जणांनी दुसरा, तर 26 हजार 300 जणांनी दक्षता डोस घेतला आहे. इतर विभागांतील फ्रंटलाईन वर्कर असलेल्या 95 हजार 687 कर्मचार्‍यांनी पहिला, 93 हजार 804 जणांनी दुसरा, तर 27 हजार 676 जणांनी दक्षता डोस घेतला आहे.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये चार लाख 93 हजार 387 जणांनी पहिला, चार लाख 50 हजार 487 जणांनी दुसरा, तर एक लाख 59 हजार 694 जणांनी दक्षता डोस घेतला आहे. 45 ते 60 वयोगटातील सहा लाख 53 हजार 678 जणांनी पहिला, पाच लाख 88 हजार 780 जणांनी दुसरा, तर 44 हजार 116 जणांनी दक्षता डोस घेतला आहे. 18 ते 45 वयोगटातील 24 लाख 363 जणांनी पहिला, 19 लाख 40 हजार 637 जणांनी दुसरा, तर 64 हजार 25 जणांनी दक्षता डोस घेतला आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

किती जणांनी घेतला पहिला, दुसरा डोस?
15 ते 18 वयोगटातील एक लाख 16 हजार 559 जणांनी पहिला आणि 76 हजार 517 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. 12 ते 14 वयोगटातील 30 हजार 174 जणांनी पहिला, तर 18 हजार 6 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. पहिला डोस 38 लाख 62 हजार 154, दुसरा डोस 32 लाख 33 हजार 458, तर दक्षता डोस तीन लाख 21 हजार 458 जणांनी घेतला आहे. अशा एकूण 74 लाख 16 हजार 914 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांत दक्षता डोस घेणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळू लागला आहे. त्याबरोबरच शाळा सुरू झाल्याने शाळेत जाऊन दोन पथकांकडून लसीकरण सुरू आहे. आणखी जास्त पथकांची गरज आहे. सीएसआरअंतर्गत आम्हाला दहा ते बारा पथके मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर शाळेतील मुलांच्या लसीकरणाचे प्रमाणही वाढेल.
– डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, महापालिका

Back to top button