पार्किंग, टेरेसवर व्यवसाय कराल तर भराल तिप्पट कर ! | पुढारी

पार्किंग, टेरेसवर व्यवसाय कराल तर भराल तिप्पट कर !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बिगरनिवासी मिळकतींच्या टेरेसवर तसेच हॉटेल, रेस्टॉरंट मॉल इत्यादीच्या साइड मार्जिनमध्ये आणि पार्किंगमध्ये अनधिकृत व्यवसाय करणार्‍यांना मिळकतींना आता तीनपट दराने मिळकतकराची आकारणी केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत.

शहरातील बिगरनिवासी (कमर्शिअल) इमारतींच्या टेरेस, पार्किंग तसेच साइड मार्जिनमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे व्यवसाय चालतो. त्यावर पालिका प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. त्यातच औंधमधील टेरेसवरील अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या हॉटेलला आग लागण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता.

त्यानंतर आता प्रशासनाने आता इमारतीच्या टेरेसवरील अनधिकृत हॉटेलवर कारवाई सुरू केली आहे. मात्र, आता प्रशासनाने यापुढे जाऊन अशा पध्दतीने केवळ कारवाई न करता मिळकतकराची आकारणी तीनपट दराने करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार बिगरनिवासी मिळकतीच्या ओपन टेरेसचा बिगरनिवासी कारणासाठी केल्यास तसेच हॉटेल, रेस्टॉरंट इत्यादीचे साइड मार्जिन व्यवसाय चालू असल्यास आणि शहरातील मिळकतींमध्ये पार्किंगमध्ये बिगरनिवासी वापर चालू असल्यास अशा सर्व मिळकतींना तीनपट कर आकारणी केली जाणार आहे.

आयुक्त कुमार यांनी मंगळवारी यासंबंधीचे आदेश काढले. दरम्यान, या बिगरनिवासी मिळकतीमध्ये अनधिकृत व्यवसाय करणार्‍या मिळकतींना तीनपट करआकारणी केली जाणार असली, तर ते नियमित झाले, असा त्याचा अर्थ होणार, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

 

Back to top button