पर्वती मतदारसंघात मतदार याद्यांचा घोळ | पुढारी

पर्वती मतदारसंघात मतदार याद्यांचा घोळ

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचनेनुसार मतदार याद्यांची विभागणी करण्यात आली. त्यामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघातील बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभागातील प्रारूप मतदार याद्या बनविताना प्रभागरचनेनुसार विभागणी केल्यानंतर जुन्या प्रभागातील मतदारांच्या नावांचा घोळ कायम असल्याचे तसेच मतदार राहत असलेल्या ठिकाणांऐवजी दुसर्‍या प्रभागात नाव आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.

एका ठिकाणी जिवंत असलेल्या मतदारांना मयत दाखविण्यात आलेले आहे. प्रभाग क्रमांक 48 मध्ये अनेक जिवंत व्यक्तींना मयत दाखवून त्यांच्या फोटोच्या नावाच्या पुढे तशी नोंद केलेली आहे. त्याचप्रमाणे एका व्यक्तीचे नाव व फोटो दुसर्‍या व्यक्तीचा आहे, असे बर्‍याच ठिकाणी निदर्शनास आले आहे.

महर्षिनगरमधील रहिवाशाचे नाव मतदार यादीत अप्पर डेपो या ठिकाणी आले आहे. यामुळे मतदार अधिकच गोंधळून गेले आहेत. इच्छुकांची धावपळ झाली असून, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी हरकती व सूचनांसंदर्भात याद्या प्रसिद्ध करण्यापूर्वीच 1 जुलै ही अंतिम तारीख दिली आहे.

Back to top button