निरा : माउलींच्या पादुकांचं निरेत शाही स्नान संपन्न  | पुढारी

निरा : माउलींच्या पादुकांचं निरेत शाही स्नान संपन्न 

बाळासाहेब ननवरे :  निरा : टाळ-मृदंगांचा गजर, पताका घेतलेला वैष्णवांचा मेळा आणि मुखी विठ्ठलनामाचा जयघोष करीत ‘अवघा रंग एक जाहला’ची अनुभूती देत चैतन्यमय वातावरणात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत खळखळून वाहणार्‍या निरा नदीतील पाण्याने श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांना निरा नदीकिनारी श्री दत्त घाटावर मंगळवारी (दि. 28) दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी शाही स्नान घालण्यात आले.

त्यानंतर माउलींच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील प्रवास संपवून सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. वारीची परंपरा सुरू करणार्‍या हैबतबाबांच्या जन्मभूमीत जमलेल्या भाविकांनी माउलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले. वाल्हे येथील मुक्काम आटोपून मंगळवारी (दि. 28) सकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळ्याने पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले.

सकाळी नऊ वाजता पिंपरे खुर्द विहीर येथे सकाळची न्याहारी घेऊन दुपारच्या नैवेद्य व विसाव्यासाठी निरा गावात अकराच्या सुमारास प्रवेश केला. या वेळी शिवाजी चौकात निरेचे सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ड. मुकुंद ननवरे, ग्रा. पं. सदस्य अनिल चव्हाण, कांचन निगडे, ग्रामसेवक मनोज डेरे यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी नदीकाठावरील पालखीतळावर विसावला. या वेळी परिसरातील हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये इंद्रायणी, निरा, चंद्रभागातीरावरील स्नानाला अधिक महत्त्व आहे. सुरुवातीला माउलींच्या पादुकांना इंंद्रायणीच्या पवित्र तीर्थाने स्नान घालण्यात येते. त्यानंतर संपूर्ण सोहळ्याच्या वाटचालीत निरा येथे नदीच्या तीर्थात श्री दत्त घाटावर माउलींच्या पादुकांना पहिले शाही स्नान घालण्याची परंपरा आहे. त्यानंतर सोहळ्याच्या प्रवासाचा अर्धा टप्पा पूर्ण होतो.

निरा भिवरा पडता दृष्टी ।
स्नान करिता शुद्धी सृष्टी ॥
अंती तो वैकुंठ प्राप्ती।
ऐसे परमेहि बोलले ॥

दुपारचा नैवेद्य झाल्यानंतर दुपारी एक वाजता हा सोहळा पादुकांना निरा स्नानासाठी मार्गस्थ झाला. निरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून माउलींचा रथ दत्त मंदिरासमोर आल्यानंतर माउलींच्या पादुका रथामधून बाहेर घेऊन सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.

या वेळी पालखी सोहळाप्रमुख ड. विकास ढगे पाटील, आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळामालक राजेंद्र आरफळकर व मानकर्‍यांच्या उपस्थितीत खळखळणारी निरा नदी, वाहणारा थंडगार वारा, मनसोक्त डुंबणारे वारकरी आणि ’माउली माउली’च्या जयघोषात व टाळ-मृदंगांच्या गजरात माउलींच्या पादुकांना दत्तघाटावर भक्तिमय वातावरणात शाही स्नान घालण्यात आले. यानंतर पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपअधीक्षक धनंजय पाटील, जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावस्कर, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, जिल्हा आरोग्याधिकारी भगवान पवार, गटविकास अधिकारी अमर माने, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, दत्ता चव्हाण, राजेश चव्हाण, माजी जि. प. सदस्य विराज काकडे आदींनी पालखी सोहळ्यास निरोप दिला.

पादुका स्नानानंतर पालखी सोहळ्याचे स्वागत साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, खा.श्रीनिवास पाटील, आ.मकरंद पाटील, साताराचे पोलिस अधीक्षक अजय बन्सल, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, सातारा जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त सीईओ महादेव घुले, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे, पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, लोणंदचे सहा.पोलिस निरीक्षक विशाल वायकर आदींनी स्वागत केले.

Back to top button