पिंपरी : परीक्षा वैद्यकीय विभागाची; प्रश्न मात्र राजकीय | पुढारी

पिंपरी : परीक्षा वैद्यकीय विभागाची; प्रश्न मात्र राजकीय

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वैद्यकीय विभागाच्या विविध 128 पदांसाठी शनिवारी (दि.25) परीक्षा झाली. वैद्यकीय विभागाची परीक्षा असल्याने त्या संदर्भात प्रश्न विचारणे आवश्यक होते. मात्र, परीक्षेमध्ये थेट राजकारण, राज्य व देशातील ताज्या घडामोडी, असे प्रश्न विचारल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. अशा परीक्षेबाबत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

पालिकेच्या नोकर भरतीसाठी टीसीएस या खासगी संस्थेला परीक्षा प्रक्रिया राबवण्याचा ठेका देण्यात आला होता. या संस्थेने 13 शहरांमध्ये 47 केंद्रांवर ही परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी 19 हजार 56 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 70 टक्के म्हणजेच सुमारे 13 हजार 500 उमेदवार उपस्थित होते. परीक्षा वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहायक, लॅब टेक्निशयन, एक्स रे टेक्निशयन, फार्मासिस्ट, एएनएम या पदांसाठी होती.

अर्ज केलेल्या उमेदवारांना वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत प्रश्न विचारणे आवश्यक होते. प्रश्नपत्रिकेमध्ये राजकीय व राज्य तसेच, देशातील ताज्या घडामोडीवरील सर्वसामान्य प्रश्नांचा भरणा होता. त्यामुळे अनेक उमेदवारांना उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे या परीक्षाप्रक्रियेवर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.

शासनाच्या निर्णयानुसारच प्रश्न

महाराष्ट्र शासनाने सरळसेवा भरती प्रक्रिया करण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याबाबतचा शासन आदेश आहे. त्यानुसार उमेदवारांना मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्न विचारण्यात यावेत, असे आदेश आहेत. त्यानुसार परीक्षेत प्रश्न विचारण्यात आले होते. त्याबाबत उमेदवारांना सूचना देण्यात आल्या होत्या, असे प्रशासक विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

Back to top button