सोशल मीडियावर राजकीय कमेंटचा धुमाकूळ | पुढारी

सोशल मीडियावर राजकीय कमेंटचा धुमाकूळ

मंचर : पुढारी वृत्तसेवा: राज्याच्या राजकारणामध्ये राजकीय उलथापालथ चालू आहे. त्याचे पडसाद आंबेगाव तालुक्यात उमटत आहेत. सोशल मीडियावर गावोगावच्या विविध राजकीय ग्रुपवर तसेच नागरिकांच्या स्टेटसवर सध्याच्या घडोमोडींचे स्टेटस ठेवले जात आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजप यांच्या कार्यकत्र्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. कित्येक राजकीय ग्रुपमध्ये आणि नागरिकांच्या स्टेटसवर जुने व्हिडीओ टाकून एकमेकांवर कुरघोड्या करण्यात येत आहेत. आमदार 50 कोटी रुपयांना विकला गेला, अशी पोस्टसुद्धा व्हायरल होत आहे. ’झाडे, हिरवळ, निसर्गरम्य वातावरण आणि हॉटेल गुवाहाटीमध्ये पाहून झाले असल्यास महाराष्ट्रात वाट पाहत आहे : नरहरी झिरवळ’ अशा मार्मिक पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या जात आहेत.

’सिल्व्हर ओकवर अजूनही वाट पाहत आहे तुमचा बाप, एकच किंगमेकर शरद पवार. “गुवाहाटीमध्ये बसून काय चर्चा करता, मुंबईला येऊन बहुमत सिद्ध करून दाखवा. मग मानलं तुम्हाला : संजय राऊत. “ एक ना एक दिवस मुंबईत यावेच लागेल. मग पाहू कोण तुमच्या पाठीशी उभे राहते : शरद पवार.“बारक्या हा डाव जिंकून दाखव, सोंगट्या फार खेळतो. मग मानलं राव तुला,’ अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. ‘नेते चालले पैशांसाठी दुसर्‍या पक्षात, कार्यकर्ता उचलतो सतरंज्या आयुष्यभर’, राजकारणातून कार्यकर्त्यांनी शिकावे की कार्यकर्ता हा आयुष्यभर कार्यकर्ता राहून उपाशी राहतो. नेता मात्र पक्ष बदलून मालामाल होतो,’ अशा टिप्पण्या असलेले मेसेज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Back to top button