राजगुरूवाड्याचे प्रवेशद्वार कोसळले | पुढारी

राजगुरूवाड्याचे प्रवेशद्वार कोसळले

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा: हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरूवाड्याचे प्रवेशद्वार सोमवारी (दि. 27) पहाटे ढासळले. प्रवेशद्वाराचे दगड, विटांचे बांधकाम असलेला भाग कधीही पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे हुतात्मा राजगुरूभक्तांना वाड्यात ये-जा करणे तसेच दैनंदिन वावर, अभिवादन करणे धोकादायक बनले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेला वाडा भीमा नदीतीरावर आहे. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक नियोजित आहे. काही कामे पूर्ण झाली आहेत, काही सुरू आहेत. मात्र, वाड्यात प्रवेश करायला असलेले प्रवेशद्वार एका बाजूने पडल्याने येथील वावर धोकादायक ठरणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात या जन्मस्थळाची डागडुजी करणे आवश्यक होते.

मात्र, राजगुरुनगर नगरपरिषद, पुरातत्व विभाग यांचे दुर्लक्ष झाल्याने राजगुरू जन्मस्थळाची दुर्दशा झाल्याचा आरोप हुतात्माप्रेमी करू लागले आहेत. हुतात्म्यांची उपेक्षा व अवहेलना होत असल्याची दुर्दैवी बाब यानिमित्ताने समोर आली आहे. देशासाठी बलिदान देणार्‍या राजगुरू यांच्या जन्मस्थळाला अनेक देशप्रेमी नागरिक दररोज भेट देत असतात. परंतु, प्रवेशद्वार कोसळल्याने देशभक्त नागरिकांना आतमध्ये जाऊ दिले जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. दगड-मातीच्या बांधकामात पाणी मुरले, तर प्रवेशद्वाराची उर्वरित भिंत जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि हुतात्मा राजगुरू समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, सचिव सुशील मांजरे, क्रांतिवीर राजगुरू ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे यांनी याबाबत खंत व्यक्त केली.

Back to top button