प्लेसमेंट च्या नावाखाली कामगारांची फसवणूक, टोळके जेरबंद | पुढारी

प्लेसमेंट च्या नावाखाली कामगारांची फसवणूक, टोळके जेरबंद

रांजणगाव गणपती ; पुढारी वृत्तसेवा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये प्लेसमेंट च्या नावाखाली कामगारांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीला पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.

लक्ष्मण ऊर्फ दादा तुकाराम डाळींबकर (वय २६, रा. बाभुळसर खुर्द), सदानंद गजानन वानखेडे (वय २२, रा. सारशिव मेहकर, जि. बुलडाणा, सध्या कारेगाव) यांना अटक केली आहे. सागर विजय रोडे (रा. करडे, ता. शिरूर) यास आजारी असल्यामुळे सूचनापत्र देऊन कारवाई केली आहे. राहुल वाळुंज (रा. पारनेर) हा आरोपी फरार आहे. या टोळीने बोगस नावांचा वापर करून प्लेसमेंट च्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे जाहिरात दिली. त्यानंतर एमआयडीसीमध्ये बोलावून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे घेतल्यानंतर प्रत्यक्षात जाहिरातीमध्ये दिलेल्या कंपन्यांमध्ये नोकरी न लावता इतर ठिकाणी बिगाऱ्याची काम करायला लावून पगार न देता मारहाण करून हाकलून देत होते.

पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भादंवि कलम ४२०, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप येळे, पोलिस कर्मचारी सुनील नर्के, पांडुरंग साबळे, दत्तात्रय शिंदे व सूरज वळेकर यांनी ही कारवाई केली.

तत्काळ पोलिसांशी संपर्क करा

एमआयडीसी परिसरामध्ये अशा प्रकारे कोणी लूट करत असेल तर तत्काळ रांजणगाव पोलिस ठाण्यास संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कोणत्याही राष्ट्रीयीकृत कंपन्या कोणालाही प्लेसमेंटकरिता नेमत नसून ते स्वतः प्लेसमेंट करीत असतात. त्यामुळे कोणीही अशा लोकांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केले.

Back to top button