भंडारा उधळत माउलींचा जयघोष; जेजुरीनगरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा प्रवेश

भंडारा उधळत माउलींचा जयघोष; जेजुरीनगरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा प्रवेश
Published on
Updated on

नितीन राऊत

जेजुरी : 'सदानंदाचा येळकोट…', 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष करीत आणि भंडार्‍याची उधळण करीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आणि वारकर्‍यांनी खंडोबादेवाच्या जेजुरीनगरीत रविवारी संध्याकाळी प्रवेश केला. या वेळी जेजुरी नगरपालिका व जेजुरी देवसंस्थान व ग्रामस्थांच्या वतीने देवाचे लेणे असणारा भंडार उधळून माउलींच्या पालखी सोहळ्याचे व वैष्णवांचे स्वागत केले. रविवारी सासवड-जेजुरीची वाट वैष्णवांनी फुलून गेली होती.

अभंगांच्या ओवीला टाळ-मृदंगांची साथ, खांद्यावर भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, पायांना लागलेली विठुमाउलीची ओढ आणि वाटेवरच असणार्‍या कुलदैवत खंडोबादेवाच्या दर्शनाची ओढ घेऊन भाविक रस्ता चालत होते. रविवारी या सोहळ्यात ऊन-सावली व ढगाळ वातावरण दिवसभर होते. सायंकाळी साडेपाच वाजता पालखी सोहळ्याने जेजुरीनगरीत प्रवेश केला. रस्त्यावर आकर्षक रांगोळी घालण्यात आली होती. कडेपठार कमानीजवळ जेजुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे, विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई,

अजिंक्य देशमुख यांनी माउलींच्या रथाचे, पालखी सोहळ्यातील दिंड्यांचे व वैष्णवांचे भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत केले. या वेळी नगरसेवक-नगरसेविका, पालिका कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. पालखी मार्गावर धर्मादाय आयुक्त सुधीर बुके, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त तुषार सहाने, विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, अशोकराव संकपाळ, प्रसाद शिंदे, राजकुमार लोढा यांनी पालखी सोहळ्याचे भंडारा उधळून स्वागत केले. देवसंस्थानच्या वतीने हजारो वैष्णवांना खंडोबादेवाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

देवाचा जयजयकार
सकाळी बोरावकेमळा येथील न्याहारीनंतर दुपारी यमाई शिवरी येथील आदिशक्ती यमाईमातेचे दर्शन, शिवरीकरांचे स्वागत व भोजन उरकून दुपारी पालखी सोहळा मल्हारीभेटीसाठी जेजुरीकडे मार्गस्थ झाला. जेजुरी जवळ येताच व गड दिसताच 'येळकोट येळकोट जय मल्हार', 'सदानंदाचा येळकोट' असा गजर वैष्णवांच्या दिंड्यांमधून होत होता. अनेक दिंड्यांनी खंडोबादेवाची गाणी, अभंग म्हणत देवाचा जयजयकार केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news