केंद्राकडून गळीतधान्य उत्पादनवाढीस प्राधान्य; साठ कोटी अनुदान

केंद्राकडून गळीतधान्य उत्पादनवाढीस प्राधान्य; साठ कोटी अनुदान
Published on
Updated on

पुणे ः पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारने 2022-23 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाचा (गळीतधान्य व तेलताड) अंतर्भाव राष्ट्रीय खाद्यतेल अभियानामध्ये केला आहे. त्यामध्ये गळीतधान्य पिके, वृक्षजन्य तेलबिया पिके आणि भातपड क्षेत्रामध्ये गळीतधान्य उत्पादन वाढीसाठी पावले उचलण्यात आली आहेत. गळीतधान्य कार्यक्रमासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सुमारे 59 कोटी 83 लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करण्यात येत आहेत. गळीतधान्य पिकांमध्ये सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफुल, करडई, जवस व मोहरी या प्रमुख गळीतधान्य पिकांचा अंतर्भाव आहे.

पायाभूत व प्रमाणित बियाणे उत्पादन, प्रमाणित बियाणे पुरवठा, प्रात्यक्षिके व प्रशिक्षणाद्वारे तंत्रज्ञान प्रसार, अनुदानित दराने कृषी निविष्ठा, सुधारित कृषी औजारे, सिंचन सुविधांचा पुरवठा आदींचा अभियानात समावेश असल्याच्या मार्गदर्शक सूचना आयुक्तालयातील कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी दिल्या आहेत. वृक्षजन्य तेलबिया पिकांमध्ये करंज, महुआ व कोकम या वृक्षजन्य तेलबिया पिकांचा समावेश आहे. या पिकांच्या क्षेत्र वृध्दीसाठी पाणलोट व पडीक क्षेत्रावर लागवड व नंतर देखभाल करणे अपेक्षित आहे.

क्षेत्रविस्तार, रोपवाटिकानिर्मिती, लागवडीनंतर दुसर्‍या वर्षापासून फळधारणेपर्यंत देखभाल, तंत्रज्ञान प्रसार या घटकांचा समावेश आहे.
भातपड क्षेत्रामध्ये गळीतधान्य उत्पादन वाढ करण्याच्या अभियानात भुईमूग, करडई, जवस व मोहरी या प्रमुख गळीतधान्य पिकांचा समावेश आहे. प्रात्यक्षिके व प्रशिक्षणाद्वारे तंत्रज्ञान प्रसार, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, अनुदानित दराने कृषी निविष्ठा, सुधारित कृषी औजारे व सिंचन सुविधांचा पुरवठा या घटकांचा अभियानात समावेश आहे. या अभियानासाठी केंद्र सरकारकडून प्रशासकीय मान्यता अपेक्षित आहे.

गळीतधान्य अभियानात बियाण्यांसाठी अनुदान असून शेतकरी शेतीशाळांद्वारे गट प्रात्यक्षिकांसाठी आणि शेतकरी प्रशिक्षण, कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून औजारेनिहाय, शिवाय पाईप्सचा पुरवठा, छोटे तेलघाणा, डिझेल-विद्युत पंपसंच, शेततळे, गोदाम उभारणी आदींसाठी अनुदान दिले जाणार आहे.

19 जिल्ह्यांची निवड…
ज्या जिल्ह्यांचे गळीतधान्य पिकांखालील क्षेत्र जास्त पण तुलनेत उत्पादकता कमी आहे, असे जिल्हे उत्पादकता वाढीसाठी व ज्या जिल्ह्यांचे क्षेत्र कमी, मात्र उत्पादकता जास्त आहे असे जिल्हे क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने गळीतधान्य अभियानांतर्गत एकूण 19 जिल्हे निवडण्यात आले आहेत. त्यामध्ये नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर यांचा समावेश आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news