ताथवडे परिसरातील गाडा रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त | पुढारी

ताथवडे परिसरातील गाडा रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

ताथवडे : पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपत आला तरी ताथवडेतील गाडा रस्त्याची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्याची कामे उरकून घेण्याचा सपाटा पिंपरी चिंचवड शहरात लावलेला असताना ताथवडेतील गाडा रस्त्याची अवस्था मात्र बिकट आहे.

येथील गाडा रस्त्यावरील दुतर्फा अनेक उच्चभ्रू सोसायट्या आहेत. तसेच, अनेक नामांकित शाळाही असल्याने या रस्त्यावरील वर्दळ वाढलेली आहे. येथील रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण ज्या ठिकाणी लोकवस्ती जास्त आहे तिथपर्यंत झालेले आहे. त्याच्यापुढे हा रस्ता कच्चा आणि खडबडीत आहे. जेथे डांबरीकरण झालेले आहे त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे येथून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

खड्डयांमुळे आणि समतल पातळी नसल्यामुळे चालकांचा तोल जाऊन काही प्रसंगी दुचाकी घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
या ठिकाणी नामांकित शाळाही असल्याने शाळकरी मुलांना ने-आ करताना पालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. रस्त्याच्या अशा दुर्दशेमुळे पालकवर्गात नाराजीचा सूर आहे. पाऊस केव्हाही पडू शकतो त्याअगोदर येथील रस्त्याची कामे पूर्ण करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

Back to top button