मंत्री पद असो वा नसो जनतेच्या सेवेसाठी सदैव सज्ज : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे | पुढारी

मंत्री पद असो वा नसो जनतेच्या सेवेसाठी सदैव सज्ज : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा: आम्हाला कधी वाटलं नव्हतं की आम्ही मंत्री होऊ. राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जादू केली त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आले आणि आम्ही मंत्री झालो. मंत्री पदाची खुर्ची हे मिरवण्यासाठी नसते. त्यातून जनतेची कामे करायची असतात. मी झोपडीपर्यंत पोहचणारा माणूस आहे. जे रुबाब करतात, माणसांत मिसळत नाहीत त्यांची अडचण होते. मी मात्र कायम जमिनीवर आहे. जे रुबाब करतात ज्यांच्या डोक्यात हवा चढते त्यांना त्रास होतो. जे जमिनीवर असतात त्यांना त्रास होणाची काही कारणचं नाही. असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

शनिवारी २५ जून रोजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भवानीनगर येथील छत्रपती मंगल कार्यालयात इयत्ता दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. भरणे पुढे म्हणाले की,आज ना उद्या मंत्री पदावरून उतरायची वेळ येतेच. काहींना 5 वर्षांनी येते, ही अडीच वर्षांनी आली. आमची बॅग तयार आहे. उद्या सरकार टिकले तरीही मुंबईला आम्ही काम करायला तयार आहोत. नाही टिकलं तरी काम करायला तयार आहोत.मात्र खूप चांगले काम या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करता आले याचा आनंद आनंद आहे.

खा.शरद पवार हे सरकार वाचवू शकतील का? असा सवाल माध्यमांनी भरणे यांना केला त्यावर ते म्हणाले हा वरिष्ठांचा विषय आहे. नेतेमंडळींचे वरिष्ठ पातळीवर काय सुरु आहे हे आपल्यापर्यंत येण्याचा विषय नाही. सरकार राहू अथवा न राहू आम्ही जनतेसोबत आहोत. ती नाळ आम्ही कधीही तोडलेली नाही. आमची नाळ जनतेसोबत आहे, त्यामुळे दु:ख वाटण्याचे कारण नाही.

Back to top button