जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडतात विद्यार्थी; खेड शिवापूर फाट्यावरील प्रकार | पुढारी

जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडतात विद्यार्थी; खेड शिवापूर फाट्यावरील प्रकार

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा: पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर (ता. हवेली) फाट्यावर शिवभूमी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. पुणे-सातारा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे, तसेच यादरम्यानच्या उड्डाणपुलाचे कामही पूर्णत्वास गेले आहे. या कामामध्ये खेड शिवापूर फाट्यावर भुयारी मार्ग उभारण्यात येणार होता. मात्र, हा भुयारी मार्ग कमी उंचीचा व रुंदीचा असल्याने भविष्यात अडचण निर्माण करणारा होता. त्यामुळे तो स्थानिक ग्रामस्थांनी होऊ दिला नाही.

परिणामी, त्या भुयारी मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढील दुरुस्ती प्रस्ताव येईपर्यंत स्थगित केले आहे. त्यामुळे या ठिकाणी भुयारी मार्ग नसल्याने विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, शिवभूमी विद्यालयात भागातील अनेक गावांमधून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. महामार्गावर भुयारी मार्ग नसल्याने महामार्ग ओलांडताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच महामार्ग ओलांडावा लागत आहे. यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर उड्डाणपूल व्हावा, यासाठी स्थानिकांनी मागणी केली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना संपर्क साधला असता त्यांनी तो स्वीकारला नाही.

खेड शिवापूर फाट्यावर जे भुयारी मार्गाचे काम सुरू होते, ते पुरंदर तालुक्यात भविष्यात होणारे विमानतळ तसेच कासुर्डी (ता. भोर) येथे असणारे औद्योगिकीकरण पाहता तेथे जाणार्‍या वाहनांसाठी अडचणीचे होते. त्यामुळे भविष्यात तेथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली असती. त्यासाठी शासनाशी चर्चा करून नवीन प्रस्ताव सादर केला आहे. त्याचे काम चार ते पाच दिवसांत सुरू होईल.

                                                             – रमेश कोंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख

Back to top button