खडकवासला : गरोदर महिलांसाठी खडकवासलात 24 तास सेवा!

खडकवासला : गरोदर महिलांसाठी खडकवासलात 24 तास सेवा!

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : खडकवासला, सिंहगड, पश्चिम हवेलीतील गरोदर महिलांना नियमित उपचारांबरोबर आवश्यक मदत मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांत 24 तास सेवा सुरू आहे. खडकवासला केंद्रात 1 हजार 400 गरोदर महिलांना वैद्यकीय सेवा दिली जात असून, प्रथमच या केंद्रात गरोदर महिलांनी उपचार व बाळंतपणासाठी नोंदणी केली आहे. खडकवासला आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गवळी व डॉ. शब्दा शिरपूरकर यांच्या देखरेखीखाली गरोदर महिलांचे लसीकरण व नियमित तपासण्या केल्या जात आहेत. सिंहगड रोड, खडकवासला भागात शहरीकरण वाढले आहे. खडकवासला केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गोर्‍हे बुद्रुक वगळता सर्व भाग महापालिकेत समाविष्ट केला आहे. मात्र, अद्यापही नांदेड, धायरी, किरकटवाडी, खडकवासला आदी ठिकाणी जिल्हा परिषदेची आरोग्य सेवा सुरू आहे.

गरोदर मातांना बाळंतपणासाठी शासन निर्णयानुसार आर्थिक मदत दिली जात असल्याने आरोग्य केंद्रात दाखल होणार्‍या गरोदर मातांची संख्या वाढली असल्याचे डॉ. गवळी यांनी सांगितले. या आरोग्य केंद्रात दरमहा नियमित तपासणी व मोफत औषधे देण्यात येत आहेत. खडकवासला आरोग्य केंद्रात वर्षभरात 1400 माता बाळंतपणासाठी नोंदणी करतात. दरमहा दहा बाळंतपणे आरोग्य केंद्रात होत आहेत.

सिंहगड भागातील खानापूर येथील आरोग्य केंद्रात वर्षभरात तिनशेहुन अधिक गरोदर महिला बाळंतपणासाठी दाखल होत आहेत. हवेली तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रात बाळंतपणासाठी दाखल होणार्‍या महिलांची संख्या वाढली आहे. हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन सूर्यवंशी यांनी आरोग्य केंद्रांतील प्रसूतीगृहाची पाहणी केली. तालुक्यातील बारा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी ऑक्सिजन सुविधा तसेच अत्यवस्थ रुग्णांसाठी आधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात सर्व मूलभूत सुविधा मोफत आहेत. तांत्रिक मनुष्यबळ सज्ज केले आहे. कर्मचारी निवासी आहेत. त्यामुळे 24 तास बाळंतपणाची सेवा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी महिलांच्या प्रसूतींच्या संख्येत वाढ झाली आहे.

                          -महेश वाघमारे, आरोग्य विस्तार अधिकारी, हवेली तालुका पंचायत समिती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news