शिकारीच सावज बनतो तेव्हा ! नागानेच गिळला विषारी घोणस | पुढारी

शिकारीच सावज बनतो तेव्हा ! नागानेच गिळला विषारी घोणस

कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा :  वन्य प्राण्यांमध्ये नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सर्वात विषारी समजला जाणारा साप आहे. मात्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा घोणस साप हा नागापेक्षा जास्त विषारी असतो. परंतु या विषारी घोणस सापाला चक्क एका नागाने गिळल्याचा प्रकार पुणे-नगर महामार्गालगतच्या एका कंपनी परिसरात समोर आला आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या परिसरात दोन साप निघाले असल्याची माहिती येथील नागरिकांनी सर्पमित्र शेरखान शेख यांना दिली. त्यांनतर शेरखान शेख, अमोल कुसाळकर, श्रेयस मांढरे, शुभम माने यांनी तेथे धाव घेत पाहणी केली असता तेथे पाच फुट लांबीचा भला मोठा नाग व त्या नागाने चक्क दोन ते अडीच फुट लांबीच्या विषारी घोणसला गिळल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्पमित्र देखील आश्चर्यचकित झाले.

त्यांनी याबाबतची माहिती वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे व सर्प अभ्यासक अमर गोडांबे यांना दिली. या दोन्ही सापांचे खाद्य उंदीर व बेडूक आहेत; मात्र अन्नाच्या शोधात नागाने घोणस सापाला गिळले असल्याचा अंदाज भाडळे व गोडांबे यांनी वर्तविला. दरम्यान सर्पमित्रांनी येथील नागाला पकडताच त्याने गिळलेला घोणस साप पूर्णपणे बाहेर काढून टाकला; मात्र घोणस सापाला यामध्ये जीव गमवावा लागला. दरम्यान पकडलेल्या नागाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.

Back to top button