पिंपरी : प्रभागात सरासरी 35 हजार मतदार | पुढारी

पिंपरी : प्रभागात सरासरी 35 हजार मतदार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी गुरुवारी (दि.23) आयुक्त राजेश पाटील यांनी प्रसिद्ध केली. एका प्रभागात सरासरी 35 हजार मतदार आहेत. त्यात सर्वात कमी 21 हजार 102 मतदार ताथवडे, पुनावळे प्रभाग क्रमांक 37 मध्ये आहेत. तर, सर्वात जास्त 52 हजार 648 मतदार वाकड प्रभाग क्रमांक 38 मध्ये आहेत. येत्या 1 जुलैपर्यंत मतदार यादीवर हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत.

पालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय 46 प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडत पार पडली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू केले. त्यासाठी 31 मे 2022 पर्यंतची पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर या चार विधानसभा मतदार संघाची मतदारयादी ग्राह्य धरण्यात आली. त्या याद्या प्रभागनिहाय प्रभाग क्रमांक 1 ते 46 असे फोडण्यात आल्या.

यादी पालिकेच्या संकेतस्थळावर, तसेच सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. यादीवर 1 जुलैपर्यंत पालिका निवडणूक विभाग किंवा क्षेत्रीय कार्यालयांकडे हरकती व सूचना दाखल करता येतील. मतदार याद्या फोडताना झालेल्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे, अशा हरकतींवर कर्मचार्यांकडून स्थळ पाहणी करून कार्यवाही केली जाईल. मात्र, नवीन नावांचा समावेश, नाव वगळणे हे होणार नाही. आपले नाव प्रभाग यादीत नाव असल्याचे मतदारांनी खातरजमा करावी, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे. येत्या 9 जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Back to top button