पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीतील ‘आघाडी’चा प्रयोग टांगणीला; सत्ता बदलल्यास राष्ट्रवादीच्या आक्रमकतेला रोख बसणार | पुढारी

पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीतील ‘आघाडी’चा प्रयोग टांगणीला; सत्ता बदलल्यास राष्ट्रवादीच्या आक्रमकतेला रोख बसणार

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तीन पक्षांनी आघाडीच्या दृष्टीने चर्चा सुरू केली होती. चर्चा सकारात्मक दिशेने पुढे सरकत असतानाच राज्यातील सरकार अस्थिर झाल्याने आघाडीचा प्रयोग महापालिकेत फिस्कटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, मागील निवडणुकीप्रमाणे राष्ट्रवादीला ‘ऐकला चलो’चा नारा द्यावा लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची वाट अधिक खडतर असेल, असे जाणकारांचे मत आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाल्याने पालिका आघाडीचे मनसुंबे उधळले गेल्याचे दिसत आहे. आघाडी न झाल्यास फेबु्रवारी 2017 प्रमाणे यंदाही राष्ट्रवादीला एकट्याने लढावे लागेल. तब्बल 139 जागेवर उमेदवार द्यावे लागतील. काही प्रभागात सक्षम उमेदवार शोधावे लागतील. एकट्याने लढताना मोठी कसरत होण्याची शक्यता आहे.महापालिका काबीज करण्यासाठी मोठी मेहनत

लागणार आहे. हत्तीचे बळ संचारलेल्या भाजपचा मुकाबला करावा लागणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसला एकमेकांचाही सामना करावा लागेल. आघाडीतील मतांच्या विभागणीमुळे साहजिकच भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख घटक पक्ष आहे. महापालिकेच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष

खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा करून पक्ष संघटन वाढीस सातत्याने चालना दिली आहे. भाजपचे 20 ते 25 माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. अजित गव्हाणे यांच्याकडे शहराची जबाबदारी देऊन संघटनेत नव्याना संधी दिली आहे. शरद पवार व अजित पवार यांच्या पाठबळामुळे शहरात पक्षाने भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलन, मोर्चे तसेच, मेळावे घेत शहर ढवळून काढले आहे.

मेळाव्यास विक्रमी गर्दी

चिंचवड येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यास विक्रमी गर्दी झाली होती. व्यासपीठावरच तब्बल 200 ते 250 पदाधिकारी व नेतेमंडळी होती. त्यांनी एकाच दिवशी महापालिकेच्या तब्बल 20 कामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले. प्रशासकीय राजवटीत महापालिकेते राष्ट्रवादीची सत्ता असल्याचा संदेश त्यांनी विरोधकांसह मित्रपक्षांना दिला. राज्यात आघाडी असल्याने पालिका निवडणुकीत शिवसेना व काँग्रेससोबत आघाडीबाबत ते सकारात्मक होते. त्याबाबत चर्चा ही सुरू झाली होती. मात्र, सध्याच्या वातावरणामुळे पालिका निवडणुकीचे चित्र पालटू शकते.

राज्यात सध्या जे चित्र आहे, त्यावर आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. जोपर्यंत निर्णय लागत नाही तो प्रतीक्षा करू. पक्षश्रेष्ठी ज्याप्रमाणे सांगतील, त्याप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी आम्ही मैदानात उतरू. निवडणुकीच्या दृष्टीने आमची तयारी झाली आहे. आघाडी करून किंवा स्वबळावर लढण्यासाठी आमची बांधणी झाली आहे.
– अजित गव्हाणे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

Back to top button