येथे कर माझे जुळती; पाचाड येथील राजमाता जिजामाता राजवाडा आणि समाधीस्थळ

येथे कर माझे जुळती; पाचाड येथील राजमाता जिजामाता राजवाडा आणि समाधीस्थळ
Published on
Updated on

राजेंद्र खोमणे

नानगाव : रायगड किल्ल्यावर जाण्याआगोदर येथील पाचाड (ता. महाड) येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची समाधी आहे. समाधीस्थळावर जाऊन दंडवत करण्यासाठी ट्रेकर्स नक्कीच जात असतात. या ठिकाणी दगडी बांधकाम असून यामध्ये जिजामाता यांचा अर्धाकृती पुतळा आहे तसेच समाधीस्थळाचे चांगल्या प्रकारे सुशोभीकरणदेखील करण्यात आलेले आहे. सूर्याआधी नमस्कार पूर्व दिशेला करावा, शिवरायांआधी दंडवत जिजामातेस करावा महाड तालुक्यातील पाचाड हे छोटेसे गाव सह्याद्रीच्या रांगेत आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे.

उतार वयात रायगड किल्ल्यावरील थंड व दमट हवा राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मानवत नसल्यामुळे छत्रपती शिवरायांनी येथे मोठा वाडा बांधला होता, याच वाड्यात जिजामाता राहात असत. या वाड्याला चारही बाजूंनी मोठी सुरक्षित तटबंदी असून वाड्याचा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. वाड्यामध्ये चौकी पहारे, मुख्य इमारत, इतर इमारती, पाण्याची विहिर असे बांधकाम आहे. वाड्याचा परिसर पाहता त्याकाळी भव्यदिव्य वाडा असावा असा अंदाज येतो. वाड्यात मोठ्या प्रमाणावर इमारतीचे अवशेष आहेत.

काही इमारतीच्या पायांना घडीव दगड वापरण्यात आलेले आहेत. या ठिकाणी दोन मुख्य इमारती पडलेल्या अवस्थेत असून त्याच इमारतीमध्ये राजमाता राहात होत्या. या इमारतीच्या चौथर्‍यावरून रायगड किल्ला व टकमकटोक नजरेच्या टप्प्यात दिसते.
जेव्हा शिवाजी महाराज गडावर असत व राजमाता पाचाड येथील वाड्यात असत तेव्हा महाराज रोज माँसाहेबांचे दर्शन घेत असत. महाराज ठरलेल्या वेळेत टकमकटोकावर यायचे, याच वेळेस जिजामाता वाड्याच्या ओट्यावरील चौथर्‍यावर येत असत तेव्हा टकमकटोकावून निशाणी होत असे व त्याचवेळी महाराज राजमातांचे दर्शन घेत असत असे या ठिकाणचे रहिवासी सांगतात.

वाड्यामध्ये दगडाचे आकर्षक बांधकाम करत दोन पाण्याच्या विहिरी आढळून येत आहेत जून महिन्यातदेखील या विहिरींना पाणी आहे. विहिरीत उतरण्यासाठी दरवाजेदेखील आहेत. यापैकी एका विहिरीवर बसण्यासाठी दगडी आसन बनविण्यात आले आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात राजमाता याठिकाणी बसत असत. जेव्हा शेजारच्या महिला पाण्यासाठी विहिरीवर येत असत तेव्हा राजमाता सर्वांची विचारपूस करत असत, त्यामुळे हे एक संवादाचे ठिकाण होते. आज जरी वाड्यातील इमारतींची पडझड झाली असेल तरी देखील वाड्याची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहे. हा परिसर पाहत असताना समोरच रायगड किल्ला खुणावत असतो, मग आपोआपच पाय तिकडे सरसावू लागतात. क्रमशः

शिवछत्रपतींच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि कायमची राजधानी रायगड हा 125 किलोमीटरचा प्रवास प्रत्येक शिवप्रेमीला पर्वणीच ठरेल असा आहे. सह्याद्रीचे डोंगर, दर्‍या, जंगल, पाऊलवाट तुडवत होणारा हा प्रवास स्वर्गसुखाचा आनंद देणारा नयनरम्य असा आहे. या प्रवासातील चित्तथरारक प्रसंग, इतिहासाच्या पाऊलखुणा दाखविणार्‍या वास्तू, नैसर्गिक वैशिष्ट्ये यासंबंधीची मालिका…

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news