लॉरेन्स बिष्णोई गँगचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन | पुढारी

लॉरेन्स बिष्णोई गँगचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन

संतोष शिंदे

पिंपरी : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या आणि बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकीचे पत्र दिल्याच्या आरोपामुळे लॉरेन्स बिष्णोई गँग पुन्हा एकदा चर्चेत आली. या गँगचे जाळे देशभर पसरले असल्याचे बोलले जात आहे. वाकड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीने आपण लॉरेन्स बिष्णोईच्या भावाला भेटून आल्याची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे लॉरेन्स बिष्णोई गँगची पाळेमुळे पिंपरी- चिंचवड शहरातही असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकांना ‘अलर्ट’ देण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिद्धू मुसेवाला प्रकरणातील संशयित संतोष जाधव हा पिंपरी- चिंचवड येथील तरुणांच्या संपर्कात असल्याचे समोर येऊ येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संतोष जाधवच्या संपर्कात असलेल्यांची माहिती काढण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, खंडणीविरोधी पथकाने वाकड येथील मारहाणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सौरभ ढोरे (वय 24, रा. राजगुरूनगर, खेड) याला सापळा रचून अटक केली. नोव्हेंबर 2021 मध्ये राम पाटील, कृष्णा पाटील, पांडू सुतार, अजय सातपुते, किरण चोपवार, अशोक काजळकर यांनी काळेवाडी फाटा परिसरात दहशत पसरवून किरण पवार या तरुणाला मारहाण केली होती. तेव्हापासून सौरभ ढोरे पोलिसांना चकवा देत होता.

पोलिसांनी सौरभला अटक केल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, सिद्धू मुसेवाला प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधव हा आपला मित्र असल्याचे सौरभ याने सांगितले. त्याच्या या कबुली जबाबामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. तसेच, सौरभ मे 2019 मध्ये संतोष जाधव सोबत राजस्थान येथे गेल्याचे समोर आले. त्यावेळी संतोष याने लॉरेन्स बिष्णोईचे भाऊ अनमोल बिष्णोई, विक्रम बिष्णोई यांच्यासोबत त्याची ओळख करून दिली. सौरभ याने संतोषच्या मदतीने मध्यप्रदेश येथून गावठी कट्टे देखील मागवल्याची कबुली दिली आहे.

लॉरेन्सचे फॉलोअर्स रडारवर

आरोपी सौरभ ढोरे याने दिलेल्या कबुली जबाबामुळे पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेची पथके अलर्ट झाली आहेत. त्याच्या संपर्कात असलेल्या सर्व तरुणांची गोपनीय माहिती काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच आगामी काळात बिष्णोई गँगला सोशल मीडियावर फॉलो करणार्‍या तसेच त्यांच्या संपर्कात असलेले तरुण पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

महत्त्वाचे धागेदोरे हाती

पिंपरी- चिंचवडच्या विशेष पथकाने संतोष जाधव यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांच्या हाती काही महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. त्या आधारे आगामी काळात शहरातील लॉरेन्स बिष्णोई गँगच्या सदस्यांची मुस्कटदाबी करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

लॉरेन्स बिष्णोई गँगचे हस्तक शोधण्यासाठी पथक वेगवेगळी पथके संतोष जाधवची चौकशी करीत आहेत. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी देखील या गँगचे कनेक्शन खोदून काढण्यासाठी विशेष पथक पाठवले होते. त्यांनी संतोष जाधव याची तब्बल एक तास सखोल चौकशी केली. मात्र, यामध्ये त्यांना नेमकी काय माहिती मिळाली याबाबत सांगता येणार नाही.
– अशोक शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण

Back to top button