योगोपचाराने मधुमेहाला ’बाय बाय’; 70 टक्के मधुमेही रुग्णांवर परिणाम | पुढारी

योगोपचाराने मधुमेहाला ’बाय बाय’; 70 टक्के मधुमेही रुग्णांवर परिणाम

सुनील जगताप

पुणे : आज बहुतांश लोक मधुमेहामुळे त्रस्त आहेत. 2030 पर्यंत भारत मधुमेही रुग्णांची राजधानी म्हणून ओळखला जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत आहार, विहार, व्यायाम आणि विचार, या चार सूत्रींबरोबरच योगोपचाराचाही अधिक फायदा मधुमेह कमी होण्यात होत असल्याचे समोर आले आहे. मधुमेहावर वेळीच उपचार न केल्याने रक्तातील साखर अधिक वाढते आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो; तसेच यामुळे अनेक आजारही उद्भवतात.

नियमित व्यायाम आणि योग प्रकार केल्यामुळे वाढता मधुमेह कमी होऊ शकतो. सर्वच प्रकारची योगासने मधुमेहासाठी उपयोगी आहेत. विशेषतः पोटावर ताण, दाब, पीळ देणारी योगासने प्रभावी ठरत आहेत. त्याचबरोबर प्राणायामही अधिक प्रभावी असून, त्याचा अभ्यासक्रम मात्र शास्त्रशुध्द आणि दीर्घकाळ करणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या युगात बहुसंख्य लोकांना मधुमेह मानसिक ताणामुळे झालेला असतो. यावर ध्यान, योग हीच उपयुक्त प्रक्रिया आहे. आयुष्यभर इन्सुलिनच्या इंजेक्शनवरच जगावे लागते; पण असे रुग्ण फक्त 5 टक्के असून, 95 टक्के रुग्णांवर मात्र योगशास्त्राचा निश्चित परिणाम होतो.

या आसनांचा फायदा
पवनमुक्तासन, पूर्वोत्तानासन, पश्चिमोत्तानासन, सेतुबंधाासन, सूर्याभीसन या आसनांबरोबरच भस्त्रिका प्राणायाम, भ—ामरी प्राणायाम, ॐ कार, शंख प्रक्षालन या आसनांसह नियमित व्यायाम केल्यास मधुमेहावर नियंत्रण राहते.

योगोपचाराचा मधुमेह नियंत्रणाला नक्कीच फायदा
कोरोनामुळे मधुमेही रुग्णांकडे सर्वच पातळीवर दुर्लक्ष झाले होते. आता कोरोना आटोक्यात आला असल्याने मधुमेही रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी प्राणायामबरोबर योगासनाची महत्त्वाची आसने नियमित करणे गरजेचे आहे; तसेच आहारावर नियंत्रणही ठेवणे गरजेचे आहे. आतापर्यंतच्या घेतलेल्या विविध कार्यशाळांमधून योगासनाची विविध आसने करून तब्बल 70 टक्के रुग्णांचा मधुमेह आटोक्यात आलेला आहे. त्यामुळे योगोपचार मधुमेही रुग्णांसाठी वरदानच ठरत आहे.

                        – मनोज पटवर्धन (मधुमेह योगोपचार विशेष तज्ज्ञ)

Back to top button