मोठी बातमी: संभाजी भिडेंसह धारकर्‍यांना परवानगी शिवाय पालखी सोहळयात प्रवेश नाही | पुढारी

मोठी बातमी: संभाजी भिडेंसह धारकर्‍यांना परवानगी शिवाय पालखी सोहळयात प्रवेश नाही

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि त्यांचे कार्यकर्ते वारीत तलवार आणि मशाली घेऊन शिरल्याचा प्रकार मागे घडला होता. त्यावेळेस धारकरी विरूध्द वारकरी यांच्यात वाद झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर पालखी सोहळा शांततामय मार्गाने पार पडावा यासाठी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखीत प्रवेश घेताना पोलिसांच्या पूर्व परवानगी शिवाय पालखी सोहळ्यात सहभागी होता येणार नसल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शिस्तबध्द असतो. वारकरी म्हणजे शांतता आणि सहिष्णुता जपणारा पंथ असल्याने या पंथात हिंसेला थारा नाही. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या प्रस्थान करणार आहे. लाखो वारकरी आळंदी आणि देहूत दाखलही झाले आहेत. बुधवारी पालखी पुण्यात दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर धारकारी आणि वारकरी वाद पुन्हा होऊ नये यादृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी आषाढी वारी होणार असल्याने वारकरी, भाविक सर्वांमध्ये उत्साहपूर्वक वातावरण दिसून येत आहे.

दोन्ही पालख्यांचे प्रस्थान झाल्यावर त्या एकाच दिवशी संचेती हॉस्पिटलजवळून पुण्यात प्रवेश करतात. त्यावेळी हॉस्पिटलजवळ संभाजी भिडे धारकर्‍यांसहित पालखी सोहळ्यात सहभागी होतात. मात्र यंदा भिडे यांना पोलीस परवानगीशिवाय पालखी सोहळ्यात घुसता येणार नाही. पुण्यात दोन्ही पालख्या 22 जूनला येणार आहेत. संगमवाडी ब्रिजच्या पार केल्यानंतर पुढील चौकात पालख्यांचे स्वागत केले जाते. तिथून पुढे संचेती हॉस्पिटलजवळून त्या जंगली महाराज रस्त्याकडे मार्गस्थ होतात.

Back to top button