

पिंपरी : महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील 15 बेडचा अतिदक्षता (आयसीयू) विभाग रूबी अलकेअर सर्व्हिसेस (प्रा. लि.) ला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. मात्र, मागील तीन महिन्यांपासून शहरातील एकाही रुग्णालयात कोरोनाचा एकही रूग्ण दाखल नसताना आयसीयू चालविण्यासाठी सतत मुदतवाढ देऊन दरमहा 23 लाख 14 हजार 770 रूपयांचा खर्च पालिका करीत आहे.
कोरोना संक्रमण वाढलेले असताना रूग्ण वाढ लक्षात घेऊन पालिकेने आयसीयुसाठी 10, 15 व 50 बेडसाठी तसेच, कोविड केअर सेंटर आणि ऑक्सिजन बेडसाठी मनुष्यबळ पुरविण्यासाठी खासगी रूग्णालय व संस्थाकडून दर मागविले होते. पंधरा बेडसाठी 4 हजार 978 प्रति दिन प्रति बेड, असा दर स्थायी समितीने 1 सप्टेंबर 2021 ला मंजूर केले आहेत. आयकॉन रुग्णालयास थेरगाव रूग्णालयातील आयसीयूच्या 28 बेडचे काम देण्यात आले आहे. तर, डॉ. जे. के. व्हेन्चर्सला आकुर्डी रुग्णालयातील आयसीयुच्या 14 बेडचे काम 3 महिने कालावधीसाठी देण्यात आले आहे.
वायसीएममधील आयसीयुच्या 15 बेडचे काम रूबी अलकेअरला 10 जानेवारी 2022 पर्यंत तीन महिन्यांसाठी दिले होते. मुदत पूर्ण झाल्यानंतर 10 मार्च 2022 अशी दोन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. पुन्हा 10 एप्रिल 2022 पर्यंत एका महिन्यासाठी मुदतवाढ दिली गेली. तसा प्रस्ताव रूग्णालयाचे अधिष्ठाता यांनी ठेवला होता. त्यानुसार एका महिन्यासाठी 23 लाख 14 हजार 770 रूपयांचे बिल पालिकेने अदा केले आहे. त्या कार्योत्तर खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे.