देहुरोड : सोहळ्यानिमित्त संस्थानने पालखी प्रस्थानचा कार्यक्रम केला जाहीर | पुढारी

देहुरोड : सोहळ्यानिमित्त संस्थानने पालखी प्रस्थानचा कार्यक्रम केला जाहीर

सोहळ्यानिमित्त संस्थानने प्रस्थानचा कार्यक्रम जाहीर केला असून, सोमवार (दि.20) व मंगळवार (दि.21) रोजीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल.

सोमवार (दि.20) रोजीचा कार्यक्रम
पहाटे 5 वाजता श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर व विठ्ठल रुक्माई महापूजा.
सकाळी 6 वाजता वैकुंठ स्थानात श्री संत तुकाराम महाराज महापूजा.
सकाळी 7 वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधीचे पूजन.
सकाळी 10 ते 12 श्री रामदास महाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन होईल.
सकाळी 9 ते 12 श्री संत तुकाराम महाराज पादुकापूजन (इनामदार वाडा)
दुपारी 2.30 वाजता मुख्य पालखी प्रस्थान सोहळ्याची प्रमुख सन्माननीय यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात.
सायंकाळी 5 वाजता पालखीची देऊळवाड्यात प्रदक्षिणा.
सायंकाळी 6.30 वाजता पालखी सोहळ्याचा इनामदार वाड्यात मुक्काम.
रात्री शेजआरती व मुख्य जागराचा कार्यक्रम होईल.

मंगळवार (दि.21) रोजीचा कार्यक्रम
सकाळी 9 वाजता पालखीची शासकीय पूजा.
तेथून पालखी खांद्यावर घेऊन शिवाजी चौकात दाखल होईल.
शिवाजी चौकात पालखी रथामध्ये ठेवल्यानंतर नगरपंचायतीच्या वतीने सर्व पालखी प्रमुखांसह आरोग्य कीट देऊन सत्कार.
मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुवासिनींकडून रथाच्या बैल जोडीची पूजा व निरोप.
अनगडशाह वली बाबा दर्ग्याजवळ पालखी रथातून पालखीतळावर ठेवण्यात येईल. अभंग आरती झाल्यानंतर पालखी पुन्हा रथामध्ये ठेवण्यात येईल.
तिथून दुपारी दीड ते दोनच्या सुमारास पालखी चिंचोलीच्या पादुका मंदिराजवळ पोहोचेल. तिथे रथावरील चोपदाराने चोप फिरवताच अभंगाला सुरुवात. चोप उंचावल्यावर अभंग समाप्ती. येथे अभंग आरती होते. दुपारची विश्रांती होऊन पालखी निगडीकडे मार्गस्थ होईल.

वारीतील मानकरी घोडेकर सराफ

देहूरोड : कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी पालखी सोहळा पुन्हा होत आहे. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही भावना आहे वारीतील मानकरी घोडेकर सराफ यांची. घोडेकर यांची सहावी पिढी पादुका उजळण्याचा मान सांभाळते. गेल्या सहा पिढ्यात एकदाही पादुका उजळण्याच्या कामात खंड पडला नाही. मागील दोन वर्ष हा खंड पडण्याची चिन्हे होती. पण आम्ही लोकांनी देवळात जाऊन पादुका उजळण्याचे काम केले, हे बोल आहेत सुनील ज्ञानेश्वर घोडेकर आणि सोनाली घोडेकर यांचे. लिंबाचा रस, चिंचेचे पाणी व रिठे घालून पादुका उजळल्या जातात. आमच्या सहा पिढ्यांचा वारसा आम्ही जोपासत आहोत. आषाढी वारीत मानकरी हे विशेष पदनाम आहे. जो मान श्री तुकाराम महाराजांच्या काळात मिळाला तो अव्याहतपणे आजही सुरू आहे. पात्रुडकर, देशमुख कानसुरकर, गिराम, खैरे, बाभुळगावकर, मसलेकर, पांडे आदींनाही वेगवेगळा मान आहे.

पूर्वीच्या काळी पाऊस पाणी खूप असायचे; मात्र रस्त्यांची सुविधा नव्हती. अशावेळी पालखी सोहळ्यासाठी आम्ही लोक पुढे आलो. त्यामुळे हा मान आम्हाला मिळाला. तो आजही चालू आहे. ही पांडुरंगाची कृपा म्हणावी लागेल, ही कथा आहे माजलगाव तालुक्यातील गंगा मसले या गावातील आनंद सोळुंके यांची. वारीत पांडुरंगाच्या मुर्तीच्या पायास स्पर्श करण्याची भावना जशी प्रत्येक भक्ताला असते, त्याहूनही अत्यानंद पादुका डोक्यावर घेताना आम्हाला होतो. पादुका डोक्यावर घेतल्यानंतर जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटते.
– आनंद सोळंके (मसलेकर)

Back to top button